बाराही महिने तहान भागवणारी 'बारा मोटेची विहीर'!

सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची इतिहास कालीन विहिर म्हणजे शिवकालिन स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमूना पहायला मिळतो. विहरीत प्रशस्त महाल देखील असुन. इस १७१९ साली बांधलेल्या या विहिरीचे पाणी कितीही दुष्काळ पडला तरी कमी होत नाही ही बारा मोटेची विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत.

Updated: Mar 22, 2017, 07:49 PM IST
बाराही महिने तहान भागवणारी 'बारा मोटेची विहीर'! title=

विकास भोसले, सातारा : सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची इतिहास कालीन विहिर म्हणजे शिवकालिन स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमूना पहायला मिळतो. विहरीत प्रशस्त महाल देखील असुन. इस १७१९ साली बांधलेल्या या विहिरीचे पाणी कितीही दुष्काळ पडला तरी कमी होत नाही ही बारा मोटेची विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत.

शिवकालीन स्थापत्य शास्त्राचं एक अदभुत उदाहरण म्हणजे ही शेरी निंब गावची बारा मोटेची विहीर... या विहिरीकडे पाहिल्यावर ही विहीर आहे की भुयारी राजवाडा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

या विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी... साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.

अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा आहेत. या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे. आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो. इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत. इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.

या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. 
खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले... 

या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानी शेजारी दोन शिल्पे कोरलेली दिसतात. एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर चढून आलो आणि पाहिला तर इथे सिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत असे लिंब शेरी ग्रामस्थ सांगतात. 

राज्यभरातून नव्हे तर देशभरातून पर्यटक बारा मोटेची शिवकालिन विहीर पाहण्यास गर्दी करीत आहेत. ऎन दुष्काळातही या विहिरीतील पाणी सर्वानाच अचंबित करुन टाकते.