बदलापूर : राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले याच्या गुंडगिरीवर सत्ताधारी शिवसेना-भाजपमधून तीव्र प्रतिक्रीया उमटलीये. अद्याप त्याला अटक का केली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून राष्ट्रवादीची मंडळी असा प्रकार करत असल्याची प्रतिक्रीया शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे यांनी दिलीय. तर भाजपच्या शायना एनसी यांनी या घटनेचा समाचार घेतलाय.
गुंडगिरी करणारे बदलापूरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आशिष दामले यांना अटक कधी होणार, असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जातोय. धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दांमलेंविरोधात दाखल झालेत.
बदलापूरपासून जवळ असलेल्या इनगावमध्ये नरेश रत्नाकर यांच्या घरात मंगळवारी रात्री ११च्या सुमारास २०-२५ कार्यकर्त्यांसह दामले घुसले. रत्नाकर यांच्याकडील बंदुक हिसकावून घेत दामलेंनी धमकावल्याचा आरोप होतोय.
दामले एक लाख रुपये घेऊन गेल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केलाय. हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. विशेष म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी दामले यांच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही त्यांच्यासोबत होते. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दामलेबरोबर एक तरुणीही दिसत आहे. ही तरुणी कोण आणि आता कुठे आहे ? असा सवालही उपस्थित होतोय.
दामले प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रीया देत आहे. मात्र पोलिस त्याच्यापर्यंत का पोहचू शकत नाही, गुंडगिरी करणा-या दामलेला अटक कधी होणार ? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया आशिष दामले यांनी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.