दीपक भातुसे, मुंबई : भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकार कॅप्टन अमोल यादव यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट या कंपनीशी संयुक्त भागिदारी करणार आहे.
पहिलं भारतीय बनावटीचं विमान बनवणाऱ्या अमोल यादव यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात विमान निर्मिती सुरू करण्याचे हे स्वप्न आता अमोल यादव यांच्या एकट्याचे स्वप्न राहिले नसून आता ते मुख्यमंत्र्यांचे आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारचे स्वप्न झाले आहे.
फेब्रुवारी २०१६ मधील मेक इन इंडिया विकमध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी आपले पहिला भारतीय बनावटीचे विमान प्रदर्शित केले होते. झी मिडियाने अमोल यांचा हा अविष्कार समोर आणला आणि देशात नवा इतिहास घडण्यास सुरुवात झाली.
अमोल यादव यांची कामगिरी झी मिडियाने समोर आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि यादव यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट कंपनीला पालघर इथे विमान निर्मितीसाठी १५७ एकर जागा देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अमोल यादव यांच्या टीमबरोबर चर्चा करून आता विमाननिर्मितीसाठी यादव यांच्या कंपनीबरोबर संयुक्त भागिदारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
डीजीसीएकडून यादव यांच्या विमानाची नोंदणी करण्यातही अडथळे निर्माण केले जात आहेत, यातही स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालणार असून याबाबत ते पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. पालघर इथे उभ्या राहणाऱ्या विमान निर्मितीच्या कारखान्यात १९ आसनी विमानाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी जगभरातील बड्या कंपन्या अमोल यादव यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत.
विमान इंजिन पुरवण्यासाठी जागतिक स्तरावरील आघाडीच्या कॅनडा येथील प्रॅटी अँण्ड व्हिटनी, तर तंत्रज्ञानासाठी जगात क्रमाक एकवर असलेल्या अमेरिकेतील रॉकवेल कॉलिंग या कंपन्या अमोल यादव यांच्या कंपनीबरोबर काम करणार आहेत. आता लवकरच राज्य सरकारबरोबर कराराचे सोपस्कार पूर्ण होऊन यादव यांच्या विमान निर्मितीचा कारखाना उभा राहिल. या सगळ्या वाटचालीत झी मिडियाने दिलेल्या साथीबद्दल त्यांनी झी मिडियाचे आभार मानले आहेत.
अमोल यादव निर्मिती करणार असणाऱ्या १९ आसनी विमानाचा वापर प्रामुख्याने रिजनल कनेक्टीव्हीटी म्हणजेच देशातील जिल्हे विमान सेवेने जोडण्यासाठी होणार आहे. केंद्र सराकरने यासाठी नुकतेच उड्डाण म्हणजेच उडे देश का आम आदमी ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात विमानतळ आहेत, मात्र या विमानतळावर उतरू शकेल असे विमान उपलब्ध होणे अवघड आहे.
यादव यांची विमाननिर्मिती सुरू झाली तर ही विमाने आपल्या देशाला स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे उड्डाणाचे स्वप्नही पूर्ण होणार असून देशात विमाननिर्मितीबरोबरच विमान प्रवासातही क्रांती घडणार आहे. अमोल यादव यांनी आपले पहिले विमान त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर तयार केले होते. आता त्यांचा हा संघर्ष प्रत्यक्ष विमान निर्मितीच्या कारखान्यापर्यंत येऊन पोहचतो आहे. यादव यांच्या पंखांना राज्य सरकारने उडण्याचे बळ दिल्यामुळे आता ही क्रांती आणि इतिहास घडण्यास जास्त विलंब लागणार नाही.