योगेश खरे, नाशिक : नोटबंदीच्या निर्णयानंतर मंदिरांची नगरी नाशिकमध्ये पुरोहितांनी अनोखं पाऊल उचललंय.
हे डेबिट कार्ड कुठे मॉलमध्ये वा दुकानात स्वॅप होत नाही. तर हे होतंय एका पंडितांच्या घरामध्ये. या भावे कुटुंबानं आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख ठरवताना एकवीस हजार रुपयांची आगाऊ दक्षिणा अनिकेतशास्री देशपांडे गुरुजीना दिली.
या ठिकाणी क्रेडीट कार्ड, व्हिसा कार्ड तसंच सर्व प्रकारचे प्लास्टिक मनी दक्षिणेरूपी देण्याची सोय केलीय. सध्याच्या अडचणीच्या स्थितीत गुरुजींनी केलेली सोय सर्व भक्तांना सुखवतेय.
मुक्तिधाम मंदिरांचे तरुण पूजक असलेले अनिकेत शास्री मंदिरातील पूजा अर्चनेबरोबरच त्यांचे ज्योतिष, पूजापाठ इतर सर्व प्रकारचे पौरोहित्य करतात. आजच्या आधुनिक युगात प्लास्टिक मनीचा वापर त्यांना आवश्यक वाटतोय.
देशात कुठेही पूजापाठ आणि कर्मकंडाच्या दक्षिणाची मोजदाद आयकर विभागाला करता येत नाही. इतकंच नाही तर यासाठी कुठेही पावती दिली जात नाही. असं असताना आपल्या श्रद्धेचं मोल व्हाईट मनीत व्हावं अशी या गुरुजींची इच्छा आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आवाहनानंतर सर्वत्र सध्या कॅशलेसचे वारे वाहतायत. कॅशलेस पंडित अनिकेत शास्त्रींनी केलेली ही व्यवहारांची सुरुवात कौतुकास पात्र ठरतेय..
प्रत्येक श्रद्धाळू मानत असलेल्या पाप-पुण्याची जोड अर्थव्यवस्थेतील ब्लॅक अँड व्हाईटशी जोडलं गेल्यास लवकर कॅशलेस होऊ शकतो. गरज आहे सर्व पुरोहित संघांनी या मार्गावर चालून पंतप्रधानाच्या स्वप्नाला साकार करण्याची.