पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द होऊन भाजपला नामुष्की ओढविणाऱ्या पुण्यातील त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं होतं. प्रभाग क्रमांक १५ मध्ये तब्बल ६२.५१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याबाबत उत्सूकता होतीच.
पुण्यातील प्रभाग क्रमांक १५ शनिवार पेठ- सदाशिव पेठ येथे ६२.५१% मतदान झालं आहे. पुण्यामध्ये सरासरी ५५.०५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवलं गेलेल्या प्रभाग क्रमांक ९, बाणेर-बालेवाडी-पाषाण येथे सर्वात कमी म्हणजे ४०.९६ टक्के मतदानाची नोंद झाली. पुण्यातील सदाशिव पेठेत गेल्या शनिवारी दुपारच्या वेळी भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या नियमांचा अनुभव घेतला होता. मतदारांनी पाठ फिरवल्यामुळे अखेर फडणवीसांनी सभा रद्द करत पिंपरी-चिंचवडकडे कूच केली होती.
पण भाजपसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्याच प्रभागात भाजपचे ४ ही उमेदवार निवडूण आले आहेत. सभा रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांनी देखील सभेची खिल्ली उडवली होती पण सभेला पाठ फिरवली असली तरी प्रभाग क्रमांक १५ मधील मतदारांनी भरघोस मत देऊन भाजपला विजयी केलं.
अ. हेमंत रासणे, ब. गायत्री खडके, क. मुक्ता टिळक, ड. राजेश येनपुरे यांचा विजय झाला आहे.