दादांची ‘स्विट डिश’ अधिकाऱ्यांना पडली ‘लय भारी’

आपल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची गोष्टच ‘लय भारी’... त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्यही ‘लय भारी’ अन् त्यांचे अनेक किस्सेही ‘लय भारी’... हा त्याचाच पुढचा भाग... 

Updated: Jul 17, 2014, 07:40 AM IST
दादांची ‘स्विट डिश’ अधिकाऱ्यांना पडली ‘लय भारी’ title=
फाईल फोटो

मुंबई : आपल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची गोष्टच ‘लय भारी’... त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्यही ‘लय भारी’ अन् त्यांचे अनेक किस्सेही ‘लय भारी’... हा त्याचाच पुढचा भाग... 

अजित दादांना जेवणानंतर ‘स्विट डिश’ दिली नाही म्हणून दादांची झालेली ‘हेळसांड’ दोन सरकारी अधिकाऱ्यांवर ‘लय भारी’च पडलीय. केवळ, दादांना ‘स्विट डिश’ दिली नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली गेलीय. त्यामुळे, उपमुख्यमंत्र्यांना दुखावणारे हे अधिकारी अडचणीत सापडलेत. 

त्याचं झालं असं... राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी, सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी जेवण घेतलं. त्यानंतर त्यांना गोड खावंसं वाटल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांकडे ‘स्वीट डिश’ची विचारणा केली... पण, विश्रामगृहावर काहीच उपलब्ध नव्हतं... म्हणून दादांना ‘स्वीट डीश’ न खाताच पुढे निघून जावं लागलं. 

मग काय... राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र हे अजिबात खपवून घेतलं नाही. त्यांनी डायरेक्ट या अधिकाऱ्यांची तक्रारच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी, राजशिष्टाचार पाळला नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. मोरे आणि उपअभियंता कृष्णा वाघ यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय... त्यामुळे, या दोन अधिकाऱ्यांसोबतच इतर अधिकारीही सुदूर-बुदूर झालेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.