'एकेबुक' निर्माता अजिंक्य कंपन्यांसाठी बनला 'मोस्ट वॉन्टेड', 2 करोडोंची ऑफर

अवघ्या 20 वर्षांच्या एका मराठमोळ्या तरुणाचं यश तुम्हालाही आनंददायी धक्का देऊ शकतं... अजिंक्य शिवाजी लोहकरे असं या तरुण विद्यार्थ्याचं नाव आहे.

Updated: Nov 8, 2015, 03:54 PM IST
'एकेबुक' निर्माता अजिंक्य कंपन्यांसाठी बनला 'मोस्ट वॉन्टेड', 2 करोडोंची ऑफर  title=

नाशिक : अवघ्या 20 वर्षांच्या एका मराठमोळ्या तरुणाचं यश तुम्हालाही आनंददायी धक्का देऊ शकतं... अजिंक्य शिवाजी लोहकरे असं या तरुण विद्यार्थ्याचं नाव आहे.

मुळचा अहमदनगरच्या कोपरगावात राहणारा अवघ्या 20 वर्षांचा अजिंक्य सध्या नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय. अजिंक्यचे वडील चप्पलचं दुकान चालवतात. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अजिंक्यला 'अॅपल' या नामांकित कंपनीकडून तब्बल 2 कोटी रुपये वार्षिक पगार देऊन आपल्या कंपनीत रुजू होण्याची ऑफर दिलीय. 

कशामुळे मिळालीय अजिंक्यला ही संधी... 
घरामध्ये कम्प्युटरही नसलेल्या  अजिंक्यला कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन्सनं वेडच लावलं. याच वेडात अजिंक्यनं 'एजेबुक' नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलंय. या अॅप्लिकेशनची माहिती कंपन्यांपर्यंत पोहचल्यानंतर कंपन्यांनाही या अॅप्लिकेशननं वेड लावलं.

एजेबुकमध्ये 2 जीबीपर्यंत डेटा शेअरिंग करता येऊ शकतो. शिवाय यासाठी तुम्हाला इंटरनेटचीही गरज नाही. साडे तीन किलोमीटरच्या अंतरात असणाऱ्या दोन डिव्हाईसला 'एजेबुक'च्या साहाय्यानं कनेक्ट करता येऊ शकतं. फेसबुक, व्हॉटसअपलाही मागे टाकण्याची क्षमता असणाऱ्या या अॅप्लिकेशनचं महत्त्व लक्षात घेत अनेक कंपन्यांनी अजिंक्यला आकर्षक ऑफर दिल्या.

याअगोदर अजिंक्यला 'इन्फोसिस'कडूनदेखील नोकरीची ऑफर मिळाली होती. यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होतं. शिवाय फेसबुककडूनही त्याला 1 कोटी 67 लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. पण, या कंपन्यांना मागे टाकत अॅपलनं अजिंक्यला तब्बल 2 कोटी रुपयांसहीत इतर सवलती देऊ केल्या... शिवाय हा जॉब करण्यासाठी अजिंक्यला देशाबाहेरही जाण्याची गरज नाही. 

लवकरच तो 'अॅपल'च्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये जॉईन होणार आहे. शिवाय, इथे राहून त्याला आपलं अर्धवट शिक्षणही पूर्ण करता येणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.