पालघर : आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांनी सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पालघर - मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी येथे आदिवासींचा सरकारविरोधातला संताप पाहायला मिळाला.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा हे कुपोषणाने मृत्युमुखी पडलेला बालक सागर वाघ यांच्यात कुटुंबियांना भेटायला आले होते. मात्र सागरच्या आईने आणि आजीने चक्क सावरा यांना दारातूनच हाकून दिले.
आज पंधरा दिवसानंतर फक्त फोटो काढून घ्यायला आले आहेत का? असा संतप्त सवाल सागरची आई सीता हिने मंत्री महोदयाना विचारून अगदी दारातच त्यांचा पाणउतारा केला. अखेर मंत्री महोदयाना ताफ्यासह काढता पाय घ्यावा लागला.
यावेळी सावरांना ग्रामस्थांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. सहाशे मुलांचा मृत्यू झाला, तुम्ही आता येत आहात का, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला. तेव्हा सहाशे मुलांचा मृत्यू झाला, असु दे की असं उद्दाम वक्तव्य विष्णू सावरांनी केलं.