अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : आधारवाडी जेलमध्यै कैदी पाठवू नका असं फर्मान कल्याण सत्र न्यायालयाने काढलंय. राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या इतकी झालीये की आता कारागृहात कैदी घेतले जाणार नाहीत असे फर्मानच कारागृह प्रशासनाने काढलय. त्यामुळे आता कैदी ठेवायचे कुठे असा प्रश्न पोलिसांना आणि कारागृह प्रशासनाला पडलाय.
नाशिक जेलमध्ये कुख्यात गुंड सर्रास फोन वापरतात हे सत्य झी 24 तासने दाखवल्यावर जेलप्रशासनातल्या भ्रष्टाचाराचं भयाण वास्तव जगासमोर आलं. आता आम्ही तुम्हाला आणखी एका जेलचं कटू सत्य दाखवणार आहोत. कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची संख्या एवढी जास्त झालीय की इथे आणखी कैद्यांना पाठवू नका असे आदेशच न्यायालयाने दिलेत.
गेल्या महिन्याभरापासून कल्याण न्यायालयात शिक्षा होणाऱ्या कैद्यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात केली जातेय. तळोजा, ठाणे, आर्थररोड आणि आधारवाडी अशी चार कारागृहात मुंबई परिसरात आहेत. मुंबईत गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता आता कैद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलीय. या कैद्यांना ठेवण्यासाठी कारागृहात पुरेसे बरॅक नाहीत. एकेका बराकीत एवढे कैदी भरले गेलेत की त्यामुळे कैद्यांना झोपाय़ला पुरेशी जागा नाही. त्यामुळे कैद्यांच्या हाणामारीचे प्रकार वाढायला लागलेत.
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी आहे. मात्र या कारागृहात तब्बल तीनपट जास्त म्हणजे 1400 कैदी आहेत. त्यात 114 महिला कैदी आहेत. या महिला कैद्यांची 23 मुलंही कारागृहातच आहेत.
खरं तर कारागृहातील या गंभीर प्रश्नांकडे कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. पण हा विषय नेहमीचाच आहे असं म्हणून वरिष्ठ अधिकारी हा विषय टाळतात. कारागृहाच्या नियुक्तीकडे साईड पोस्टींग म्हणून इथे येण्यासही कर्तव्यदक्ष अधिकारी तयार नसतात. त्यामुळे कारागृहांचे प्रश्न चिघळतच चालले आहेत.