नाशिक : खासगी हॉस्पिटल्समध्ये गर्भपाताची कीड लागल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येतात. मात्र नाशिकमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणातल्या भांडणांमुळे आता असे प्रकार महापालिका आणि जिल्हा रूग्णालयात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात उच्चस्तरीय समितीने चौकशी सुरू केली आहे.
जिल्हा रूग्णालयात संशयास्पद गर्भपात होत असल्याची तक्रार आल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपसंचालक दर्जाच्या अधिका-याकडून आता याप्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. महापालिका आरोग्य अधिका-यांनाही जिल्हा रूग्णालयातले काही केसपेपर संशयास्पद असल्याचे आढळले आहेत. वीस आठवड्यांपेक्षा अधिक गर्भवती असलेल्या महिलांचा तांत्रिक गर्भपात करण्याचा प्रकार समोर आलाय. दर महिन्याला असा एक तरी प्रकार घडतोय.
अशा प्रकरणाची तपासणी केली असता या प्रकरणाचे अनेक पेपर गहाळ झाल्याचं समोर आलंय. गर्भवती महिलेला जीवाला धोका असल्यास आपातकालीन स्थितीत जीव वाचवण्यासाठी हे करावं लागतं असा पवित्रा जिल्हा रूग्णालयाने घेतला आहे.
हे सर्व प्रकार पाहता कुठे तरी पाणी मुरतंय असा संशय व्यक्त होतोय. शासकीय आरोग्य व्यवस्थेचा गैरवापर करून काही जण पैसा कमावण्यासाठी असे उद्योग करत असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.