जळगाव : (६ जुलै २०१५) अपघातात जखमी झालेल्या या महिलेच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचं सांगण्यात येत आहे, या महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेच्या शेजारी फोटोत दिसत असणाऱ्या लहान मुलीची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगण्यात येत आहे. या महिलेचं नाव नलीनी चव्हाण-भदाणे असल्याचं सांगण्यात येत आहे.
या फोटोत लपलंय एक भीषण वास्तव | ५ जुलै २०१५
या फोटोत एक भीषण वास्तव लपलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. हा फोटो जेव्हा तुम्ही नीट पाहाल तेव्हा लक्षात येईल, महिलेच्या डाव्या हाताजवळ एक तान्हं बाळ आहे, हे रस्ते अपघाताचं एक भीषण वास्तव आहे. हा फोटो पाहून कुणालाही वाटेल या तान्ह्यासाठी या मातेला जीवनदान मिळो.
बाळाच्या चेहऱ्यावरही रक्ताचे डाग आहेत. एवढी गंभीर दुखापत झाल्यानंतरही या महिलेने आपला मायेचा हात बाळाच्या डोक्यावर कायम ठेवला आहे. रस्ते अपघातात कुणा-कुणाचं छत्र हरवलं जातं, रस्ते अपघाताची दाहकता किती असते हे सांगणार हे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे, यापूर्वी एसटी आणि कंटेरनच्या धडकेत २२ प्रवासी ठार झाले होते. आजही अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावाजवळ ट्रॅव्हल्स आणि मारूती ८०० गाडीची धडक झाली, यात ३ ठार तर ४ जखमी आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.