सावित्री पुलाशेजारील नव्या पुलाचे बांधकाम 90 टक्के पूर्ण

महाडजवळच्या अपघातग्रस्त सावित्री पूलाच्या शेजारीच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पूलाचे काम 90 टक्के पूर्ण झालंय . अवघ्या 6 महिने इतक्या कमी कालावधीत पूर्ण झालेला कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असावा 

Updated: May 14, 2017, 04:42 PM IST
सावित्री पुलाशेजारील नव्या पुलाचे बांधकाम 90 टक्के पूर्ण title=

प्रफुल्ल पवार , झी मीडिया, रायगड : महाडजवळच्या अपघातग्रस्त सावित्री पूलाच्या शेजारीच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पूलाचे काम 90 टक्के पूर्ण झालंय . अवघ्या 6 महिने इतक्या कमी कालावधीत पूर्ण झालेला कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असावा 

मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्हयातील महाडजवळचा सावित्री नदीवरील पूल 2 ऑगस्टच्या मध्यरात्री कोसळला. या अपघातात दोन एस.टी.बसेसमधील प्रवाशांसह 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. 

या घटनेची केंद्र सरकारनं तातडीनं दखल घेत पूलाचं काम तातडीनं सुरू करण्याचा निर्णय घेतला.15 डिसेंबर पासून या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाचं काम 6 महिन्याच्या आत पूर्ण होतंय. येत्या 5 जूनला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या पूलाचं उदघाटन होणार आहे. 

जुन्या अपघातग्रस्त पूलाच्या शेजारीच हा नवीन पूल उभा राहिलाय. त्यासाठी 27 कोटी रूपये इतका खर्च झालाय. हा पूल  239 मीटर लांब तर 16 मीटर रूंद आहे. 10 खांबांवर उभ्या असणा-या या पूलावर वाहनांसाठी तीन लेन असणार आहेत. दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड मीटर रुंदीच्या पादचारी मार्गिका असतील. याशिवाय काँक्रीटचे अॅपरोच रोड उभारण्यात येतायत. 

सरकारनं प्रतिष्ठेची बाब म्हणून या पूलाच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केलं. असाच वेग मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाच्या कामात आला तर कोकणवासियांचा प्रवास ख-या अर्थानं सुखकर होईल.