Badlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्या गावात तो राहात होता, तिथल्या त्याच्या घराची काही अज्ञात लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनाही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे. बदलापूरमधल्या (Badlapur Case) खवई या गावात अक्षय शिंदेचं घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराला बाहेर कुलूप होतं, पण लोकांनी घराच्या काचा फोडून आतल्या सामनाची तोडफोड केली.
कोण आहे अक्षय शिंदे?
अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो 24 वर्षांचा आहे. शाळेत साफ सफाई करण्याबरोबरच लहान मुला-मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याचं काम तो करत होता. मुलं अक्षयला काठिवाला दादा म्हणून ओळखायचे. कंत्राटी पद्धतीवर अक्षयला बदलापूरच्या शाळेत नोकरी मिळाली होती. आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत डांबण्यात आलंय. आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असं आवाहन कल्याण वकील संघटनेनं केलंय. बदलापूर लैंगिक अत्याचार खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीये. तपासातील उणिवा शोधणं हे मुख्य काम असणार आहे,असं निकम यांनी स्पष्ट केलंय.
बदलापूर घटनेचे राज्यभर पडसाद
बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन केलीत. बदलापुरात सध्या तणावपर्ण शांतता आहे आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सध्या बदलापुरात शाळांना सुट्टी देण्यात आलीय. इंटरनेट सेवाही बंद ठेवलीय.
एसआयटीचा तपास सुरु
बदलापूर अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरणी, नेमलेल्या SIT टीमनं पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरडींवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी SIT टीम स्थापन करण्यात आली. या टीमनं दोघींच्याही पालकांचा जबाब नोंदवला.
दरम्यान, बदलापूरमध्ये निषेधाचे बॅनर लागलेत. बदलापूरमध्ये विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर लागलेत...बदलापूरकर म्हणून आम्ही दुर्दैवी प्रकाराचा निषेध करतो आणि त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर्स लागलेत. माय चाईल्ड इज नॉट फॉर पॉलिटीक्स असंही बॅनर्सवर लिहिण्यात आलंय.