मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात चार जण दोषी, जन्मठेपेची शिक्षा

नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे प्रकरणाचा जिल्हा न्यायालयात आज निकाल लागलाय. मोनिका हत्या प्रकरणात चार आरोपी दोषी ठरलेत

Updated: Jun 2, 2015, 04:03 PM IST
मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात चार जण दोषी, जन्मठेपेची शिक्षा title=

नागपूर : नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे प्रकरणाचा जिल्हा न्यायालयात आज निकाल लागलाय. मोनिका हत्या प्रकरणात चार आरोपी दोषी ठरलेत. त्यांच्यावर खून आणि षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

तर गीता मालदुरे, रमेश सोनीकर या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. या दोघांवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. सरकारी पक्षानं आणि मोनिकाच्या आई-वडिलांनी दोषींसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. 

११ मार्च २०११ ला अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थीनी असलेल्या मोनिकाचा नागपूरच्या नंदनवन परिसरात तिच्या महाविद्यालयाजवळ  खून झाला होता. मारेकऱ्यांच्या निशाण्यावर दुसरीच तरुणी असताना, चुकीने मोनिकाचा खून झाला होता. या खुनाचा मास्टरमाईंड काटोलचा रहिवासी असलेला कुणाल जैयस्वाल होता. त्याच्यासोबतच पोलिसांनी श्रीकांत सोनेकर, प्रदीप सहारे आणि उमेश मराठे या तिघांनाही अटक केली होती.

कोणतीही चूक नसताना जीव गमवावा लागलेल्या मोनिका हत्येनंतर संतप्त नागपूरकर मोनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. महत्त्वाचं म्हणजे, कोणताही पुरावा नसताना आणि मोनिकाची हत्या का झाली असावी? याचा कोणताही धागादोरा नसताना नागपूर पोलिसांनी या खुनाचं कोडं उलगडलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.