पॅरोलवर सुटलेले २१७० कैदी फरार

गेल्या दशकभरात नाशिकसह राज्यातून एकूण 2170 कैदी पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेत. यामुळे पॅरोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे तात्पुरती मलमपट्टी झाली असली तरी या प्रकाराने कारागृहाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय. 

Updated: Aug 31, 2016, 08:38 PM IST
पॅरोलवर सुटलेले २१७० कैदी फरार title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या दशकभरात नाशिकसह राज्यातून एकूण 2170 कैदी पॅरोलवर बाहेर येऊन फरार झालेत. यामुळे पॅरोल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे तात्पुरती मलमपट्टी झाली असली तरी या प्रकाराने कारागृहाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय. 

सज्जाद मुगल हा आरोपी नाशिकच्या कारागृहातून आईच्या उपचारांसाठी पॅरोल घेऊन 28 एप्रिलला बाहेर आला आणि फरार झाला... नामांकीत वकील पल्लवी पूरकायस्थ यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. चार महिने झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही. या प्रकरणात एका जेलरला निलंबीत करण्यात आलंय. मात्र नाशिकच्या जेलमधून असे एक दोन नाही तर तब्बल 17 आरोपी फरार आहेत. त्यातले बहुतांश जन्मठेप आणि इतर गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारे आहेत. 

कसा मिळतो पॅरोल

न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या पक्क्या कैद्यांना पॅरोल किंवा फर्लोच्या नावाखाली वर्षात काही दिवसांची सुट्टी मिळते. विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज केल्यानंतर त्याच्या संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल मागवण्यात येतो. त्याला सुट्टीवर घरी पाठवलं तर गावातलं वातावरण बिघणार नाही ना याबाबत हा अहवाल असतो. अनुकूल अहवाल आणि कारागृहातील वर्तणूक लक्षात घेऊन विभागीय आयुक्त त्याला 28 दिवसांसाठी पॅरोलवर सोडू शकतात. फर्लोबाबतही अशाच अहवाला आधारे उपमहानिरिक्षक 14 दिवसांपर्यंत रजेवर सोडू शकतात. 

 

मात्र  कैद्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून ही सूट दिली जात असली तरी त्याचा गैरवापर वाढलेला पाहायला मिळतंय. 

ही आहे आकडेवारी

2004 सालापासून आत्तापर्यंत एकूण 2171 कैदी पॅरोलवर सुट्टी घेऊन फरार झालेत. 2010 मध्ये 1526 कैदी रजेवर गेले त्यापैकी 514 फरार होते. त्यातल्या 86 जणांना अटक करण्यात यश आलं. 2011 मध्ये 1706 कैद्यांनी सुट्टी घेतली त्यापैकी 333 फरार झाले त्यातल्या 191 जणांना अटक करता आली. 2012 मध्ये 2897 पैकी 198 फरार झाले त्यापैकी 41 जणांना पकडण्यात आलं. 2013 मध्ये 1519 जण सुट्टीवर गेले त्यापैकी 305 फरार झाले आणि 66 जणांना पकडलं. 2014 मध्ये 259 जणातली 58 फरार झाले तर 43 पकडले गेले. 

कैद्यांना सुट्टी देताना कारागृह प्रशासनाने योग्य काळजी घेतलेली नाही हे यातून स्पष्ट होतंय. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना न जुमानता कारागृह पोलिसांनी सोडलं कसं याचीही चौकशी होण्याची गरज आहे. 

कारागृहात भ्रष्ट कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. सरकारने त्याची चौकशी करून हा भ्रष्टाचार रोखण्याऐवजी थेट पॅरोल फर्लो बंद करून पांघरूण घातल्याचा आरोप करण्यात येतोय.