२१ लाखांच्या नव्या नोटा जप्त

नविन नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या 2 जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2 हजारांच्या नोटांच्या स्वरूपात 17 लाख रुपये आणि 500 च्या 27 हजार रुपयांसह 21 लाख 22 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

Updated: Dec 15, 2016, 09:08 PM IST
२१ लाखांच्या नव्या नोटा  जप्त   title=

कल्याण : नविन नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या 2 जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2 हजारांच्या नोटांच्या स्वरूपात 17 लाख रुपये आणि 500 च्या 27 हजार रुपयांसह 21 लाख 22 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसरात 2 जण जुन्या नोटा बदलून देण्यासाठी येणार असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे संदीप हॉटेल परिसरात सापळा रचून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघांकडूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तर त्या दोघांकडे असणाऱ्या ऍक्टिव्हा गाड्यांची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आली. 

या रकमेबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनिल भारद्वाज यांनी दिली.

तर संपूर्ण रकमेची मोजणी केली असता 2 हजारांच्या 17 लाख 44 हजार रुपये किंमतीच्या, 500 रुपयांच्या 27 हजार रुपये आणि 100, 50 रुपयांच्या सुमारे 2 लाख रुपये असे एकूण 21 लाख 22 हजार रुपये आढळून आले. त्यासोबत 10 चेकबूक मिळाले असून यासंदर्भात आयकर विभागाला माहिती कळवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.