चिंताजनक...पुण्यातून हरवलीत वर्षभऱात १२५ मुलं...

पुणेकरांना काळजी करावी, अशी एक बातमी आहे. वर्षभरात पुण्यातून जवळपास १२५ मुलं - मुली हरवली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. हरवलेल्या या मुलांचा शोध लागण्याचं प्रमाण देखील अत्यल्प आहे. हरवलेल्या मुलांपैकी तब्बल ९० टक्के मुलांना शोधण्यात यश आलेलं नाही. मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्ती हरवण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. पाहूयात झी २४ तासचा विशेष रिपोर्ट… 

Updated: Apr 9, 2015, 03:56 PM IST
चिंताजनक...पुण्यातून हरवलीत वर्षभऱात १२५ मुलं... title=

नितीन पाटणकर, पुणे : पुणेकरांना काळजी करावी, अशी एक बातमी आहे. वर्षभरात पुण्यातून जवळपास १२५ मुलं - मुली हरवली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. हरवलेल्या या मुलांचा शोध लागण्याचं प्रमाण देखील अत्यल्प आहे. हरवलेल्या मुलांपैकी तब्बल ९० टक्के मुलांना शोधण्यात यश आलेलं नाही. मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्ती हरवण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. पाहूयात झी २४ तासचा विशेष रिपोर्ट… 

पुण्यातल्या सदाशिव पेठेत राहणारे, हे आहेत अभय किराणे… किराणे यांचा मुलगा २००९ मध्ये हरवलाय. अजिंक्य त्याचं नाव. नुकताच दहावी पास झालेला अजिंक्य अॅडमिशनसाठी तळेगावला गेला होता. काम संपवून तो पुण्याला निघालाही… लोकलमध्ये बसल्यावर त्यानं घरी फोन करून तसं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र, अजिंक्य आजतागायत घरी पोहचलेला नाही. पोलिसांमध्ये तक्रार दिलीय. कुटुंबियांनी देखील अजिंक्यला शोधण्यासाठी जंग-जंग पछाडलंय. मात्र, अजिंक्यचा काहीच तपास नाही. अशीच अवस्था पुण्यातील अनेक पालकांची झाली असणार आहे… कारण २०१४ या एका वर्षात पुण्यातून अठरा वर्षाखालील १२३ मुलं - मुली हरवले आहेत… 

पुण्यात १८ वर्षाखालील मुलं हरवण्याचं प्रमाण २०१४ मध्ये दुपटीनं वाढलं आहे. त्याचबरोबर मोठ्या व्यक्ती हरवण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. मागील पाच वर्षातील ही तुलनात्मक आकडेवारी पाहूयात आकडेवारीच्या माध्यमातून… 

वर्ष   हरवलेली लहान मुलं  हरवलेल्या मोठ्या व्यक्ती
२०१० ९  ९४
२०११ १६ १३२
२०१२ १८ १३०
२०१३ ५१   ३९६ 
२०१४ १२३   ६८३ 

हरवणाऱ्या मुलांची संख्या वाढत असली तरी, त्यांचा शोध लागण्याचं प्रमाण मात्र अगदी अत्यल्प आहे. मुलांचा शोध लागण्याचं प्रमाण जेमतेम दहा टक्केच आहे. चौदा वर्षाखालील मुल हरवल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करावा. असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यानुसार पोलिस अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करत आहेत… गुन्हा दाखल केल्यांनतर तपास मात्र काटेकोर होत नसल्याचं तेरा बच्चा मेरा बच्चा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते विनोद जैन यांनी सांगितले. 

मुलं हरवण्याचं प्रमाण वाढलंय. हे पोलिस देखील मान्य करतात. मात्र, तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप पोलिसांना मान्य नाही. उलट हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी पोलिस आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळं हरवलेलं मुल किंवा व्यक्ती देशात कोठंही सापडली तरी ते पोलिसांना कळू शकते. असं पोलीसांच म्हणणं आहे. 

मुलं हरवण्याचं हे प्रमाण निश्चितच काळजी करायला लावणारं आहे… त्याहूनही चिंतेची बाब आहे ती म्हणजे, एकदा हरवलेली हि मुलं पुन्हा सापडत नाहीत. त्यामुळं पालकांनीच आपल्या मुलांची काळजी घेतलेली बरी… 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.