पुणे: बिया काळे... वय वर्ष २०... झाडाच्या फांदीला गळफास लावून तिनं आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
पुणे महानगरपालिकेनं तीन महिन्यापूर्वी बिया काळेचं उत्पन्नाचं साधन असलेला आकाशपाळणा जप्त केला. त्यांना घर नाही... स्थलांतरीत आदिवासी कुटुंब असलेल्या बिया काळे आणि तिच्या कुटुंबियांनी जगण्यासाठी पुणे गाठलं.
नवरा, दीड वर्षाचा मुलगी, सासू-सासरे या आपल्या कुटुंबासह ती पुण्यात राहायची. नवरा दररोज मोलमजुरीची कामं करतो. तर बिया फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड अशा गर्दीच्या ठिकाणी आपला आकाशपाळणा लावायची. तेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन होतं, असं तिचे सासरे इंद्रजित काळे यांनी सांगितलं.
महापालिकेनं तीन महिन्यांपूर्वी आकाशपाळणा जप्त केला आणि त्यांच्यावर उपासमारी वेळ आली. 'त्यांनी फक्त आकाशपाळणाच जप्त केला नाही, तर कपडे आणि इतर सामानही जप्त केलं. आमच्याकडे काही उरलं नाही. बिया घोले रोडवर असलेल्या ऑफिसमध्ये गेली, तिनं खूप विनवण्या केल्या. पण त्यांनी दंड भरायला सांगितला. जेव्हा बिया दंडाची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचली तेव्हा तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये असल्याचं सांगण्यात आलं,' असं इंद्रजित घोले यांनी सांगितलं.
जेव्हा तिच्या आत्महत्येबाबत सांगायला बियाचा नवरा महापालिका कार्यालयात गेला तेव्हा, तुमच्या घरगुती कारणानं तिनं आत्महत्या केली, असं सांगण्यात आलं. घोले रोड विभागाचे अतिक्रमण विरोधी अधिकारी उमेश नरेळे यांनी सांगितलं, "इंद्रजित हे फॉर्म आणि कागदपत्र घेऊन आले होते. आकाशपाळणा बियाच्या नावावर होता. त्यांच्या अंतर्गत वादामुळं तिनं आत्महत्या केली असेल", असं म्हणत नरेळे यांनी आपला हात झटकला. "आम्ही अनधिकृत हॉकर्स विरुद्ध कारवाई सुरू केली. त्यांना घर नाही पण आम्ही त्यांना नानापेठ इथं राहण्यासाठी जागा दिलीय."
अतिक्रमण विरोधी विभागाचे डेप्युटी कमिश्नर माधव जगताप म्हणाले, या घटनेकडे मी स्वत:हून लक्ष देतोय. त्यांचं कुटुंब नॉन रिजस्टर्ड हॉकर्स पैकी एक आहे. त्यामुळं कायद्यानं त्यांची जप्त केलेली वस्तू परत करणं गरजेचं नाही. पण मानवतेच्या आधारे काही करता येतंय का? याचा विचार आम्ही करतोय.
बियानं महापालिका ऑफिसच्या तीन महिन्यांमध्ये खूप चकरा मारल्या. पण काहीही झालं नाही आणि तिला हॉकर्स रजिस्ट्रेशनबद्दलही माहिती दिली गेली नाही. अजूनही शहरात असे अनेक हॉकर्स आहेत, ज्यांनी आपलं नाव रजिस्टर्ड केलेलं नाही. त्यामुळं इतरांनी याचा विचार करायला हवा.
बियाचा नवरा आणि मुलगी अजूनही धक्क्यातच आहे. ते कुटुंब परत कर्नाटक राज्यात परतण्याचा विचार करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.