ऑडिट धारावी मतदारसंघाचं

मुंबईतल्या धारावी मतदारसंघात, विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड यांना आव्हान देत शिवसेना भगवा फडकवण्यासाठी जय्यत तयारी करू लागली आहे.

Updated: Oct 7, 2014, 06:00 PM IST
 title=

मुंबई : मुंबईतल्या धारावी मतदारसंघात, विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड यांना आव्हान देत शिवसेना भगवा फडकवण्यासाठी जय्यत तयारी करू लागली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपड्डपट्टी, धारावीची ही ओळख आजही कायम आहे. कामाच्या शोधात मुंबईत येणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्याला धारावी झोपडपट्टी म्हणजे जणू हक्काचं ठिकाण वाटतं. तर वर्षानुवर्ष इथल्या झोपडपट्टीत राहणारी अनेक कुटुंबही आपल्याला इथे पहायला मिळतात, आणि म्हणूनच या एक गठ्ठा मतांवर कायमच सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. 

धारावीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचं पक्षाचं वर्चस्व आहे. 2 लाख 70 हजार मतदार असलेल्या धारावीचं नेतृत्व सध्या वर्षा गायकवाड करीत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एकनाथ गायकवाड यांच्या वर्षा गायकवाड कन्या आहेत. 

सलग दोन टर्म आमदार म्हणून काम करत त्यांनी आपलं संघटन कौशल्य अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्येचं थेट राज्यमंत्री आणि त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये कँबिनेट मंत्री पदाची बक्षिसी वर्षा गायकवाड यांना मिळालीयं. 

धारावीत पॉश स्पोर्टस काँम्प्लेक्स, गार्डन, आयटीआय अशी अनेक विकासकामे केल्याचा दावा वर्षा गायकवाड करीत आहेत. 

वर्षा गायकवाड विकास कामे केल्याचे ठामपणे सांगत असल्या तरी मतदार संघातील त्यांचे विरोधक मात्र हे नाकारतात. गायकवाड यांना मुख्यतः आव्हान असणार आहे ते शिवसेनेचे. 

शिवसेनेकडून माजी आमदार बाबूराव माने आणि मनोहर रायबागे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच बसपाकडून संदीप कटके यांना उमेदवारीची शक्यता आहे. 

गेल्या वेळच्या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी 52 हजार 492 मते मिळवत 9 हजार 709 मतांनी निसटता विजय मिळवला होता. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे मनोहर रायबागे यांना 42 हजार 783 मते मिळाली होती. एकूणच या राजकीय धुळवडीत धारावी मतदारसंघात काही मुद्दे नेहमीच गाजतात. 

यात धारावी झोपड्डपटी पुर्नविकास, रस्ते आणि शौचालयाची समस्या, स्थानिक गुन्हेगारीचा समावेश आहे.

गायकवाड पिता-पुत्रीकडे गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता असूनही धारावीचा विकास झाला नाही अशी टीका होतेय. त्यामुळे विधानसभेच्या लढाईसाठी इच्छूक असलेल्या त्यांच्या विरोधकांनी यावरच भर देत टीकास्त्र सोडलंय.

लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे विजयी झालेले खासदार राहुल शेवाळे यांना या मतदार संघातून 2 हजार 800 मतांची आघाडी मिळाली होती. लोकसभेत त्यांनी विकासाचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे अर्थातच विधानसभेलाही हाच मुद्दा सर्वच पक्ष उचलून धरण्याची शक्यता दिसत आहे.

सत्ताधारी आणि विरोधक विकासाच्या गप्पा मारत असले, तरी धारावीतील सर्वसामान्य माणूस मात्र नाराजीच व्यक्त करताना दिसतोय. इथल्या समस्यां सोडवण्याबाबत राजकीय नेते फक्त गप्पा मारतात समस्या मात्र तशाच राहतात, अशी खंत इथले नागरिक व्यक्त करतांना दिसून येतात.

धारावीत विद्यमान आमदार वर्षा गायकवाड असल्या तरी मतदार संघात काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक असल्याचं विदारक सत्य आहे. त्यातच लोकसभेप्रमाणे मोदी लाट उसळली, तर वर्षा गायकवाड यांना विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.