कोल्हापूर : राज्याच्या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही उडी घेतलीय. कोल्हापूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासोबतच सोनिया गांधीही उपस्थित होत्या.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोल्हापूरच्या पहिल्यात सभेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रात सत्तेत आल्यापासून भाजप महाराष्ट्रविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप सोनिया गांधींना केलाय. महाराष्ट्र सरकारनं शिवस्मारकाचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनं त्याला विरोध केल्याचा आरोपही सोनियांनी आपल्या भाषणात केला.
यावेळी, सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांच्या भाषणांचा चांगलाच समाचार घेतलाय. ‘महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे न्यायचंय...’ या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर टीका करत ‘या लोकांना हेदेखील माहीत नाही की महाराष्ट्र गुजरातपेक्षा जवळपास सगळ्याच क्षेत्रांत पुढे आहे’ असा टोला सोनियांचा हाणलाय.
देशातील गोरगरीब जनतेला मोठमोठी स्वप्न दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं... दुसऱ्यांच्या कामाला आपणचं केलंय असं सांगण्यात हे माहीर आहेत... यूपीए सरकारनं गेल्या 60 वर्षांत केलेल्या योजनांची नावं बदलून हे त्यावर आपला शिक्का मारतायत, असा हल्लाबोलही यावेळी सोनियांनी केला.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपनं अनेक वल्गना केल्या होत्या... अनेक आश्वासनं दिली होती... भाजपनं 100 दिवसांत विदेशांतील काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? पाकिस्तानला भाजपनं काय धडा शिकवला...? जनतेच्या मनातले असे अनेक सवाल यावेळी सोनियांनी जाहीर सभेत उपस्थित केले.
‘इतकी वर्ष काँग्रेसनं राज्य करूनही कधी हिशोब दिला नाही मग, 60 दिवसांत आपल्याकडे काय हिशोब मागता’ असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी एका सभेत केलं होतं. त्यावरच, लोकसभा निवडणुकांत दिलेल्या आश्वासनानंतर आत्ता सत्ता आल्यावर कामाचा जर हिशोब मागितला तर एवढं हैराण व्हायला काय झालं? असा सवालही सोनियांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.