अखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली!

कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय. 

Updated: Oct 21, 2014, 06:28 PM IST
अखेर, शिवसेनेची ४८ वर्षांची प्रतिक्षा संपली! title=

रत्नागिरी : कोकण... शिवसेनेचा बालेकिल्ला... पण, या बालेकिल्ल्यात रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून सेनेचा पहिला आमदार निवडून जाण्यासाठी शिवसेनेच्या स्थापनेपासून (१९६६) आत्तापर्यंत प्रतीक्षा करावी लागलीय. 

रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगडमधल्या १५ विधानसभेच्या जागांपैकी ७ जागा आपल्या पदरात पाडत शिवसेनेनं कोकणातलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. नारायण राणे, भास्कर जाधवांसारख्या नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतरही कोकणी माणसांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिला. रत्नागिरीत मात्र पक्ष स्थापनेपासून शिवसेनेला अजूनही विजयाची प्रतीक्षा होती. 

हीच प्रतिक्षा 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं संपली... रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर विधानसभेत गेलेत.

रत्नागिरी आधी जनसंघाचा बालेकिल्ला होता... त्यानंतर भाजपचा बालेकिल्ला झाला... शिवसेनेचीही ही जागा भाजपचीच असल्याची धारणा होती. त्यामुळे रत्नागिरीच्या जागेवर शिवसेनेकडून कधीच बंडखोरी किंवा शक्तीप्रदर्शन झालं नाही. त्यामुळे भाजपनंतर ही जागा राष्ट्रवादीनं हिसकावून घेतली. पण, शिवसेनेनं या जागेवर दावा केला नव्हता. पण युती तुटल्यानं आणि उदय सामंतांच्या शिवसेना प्रवेशानं सगळी समीकरणं बदलली... आणि रत्नागिरीचं सत्ताकेंद्र शिवसेनेच्या ताब्यात आलं.

एकूणच कोकणच्या या लाल तांबड्या मातीत हा एवढाच भाग शिवसेनेकडे नाही हे शिवसैनिकांचं शल्य आता पुसलं गेलंय आणि तांबड्या मातीतलं राजकारण आता भगवं झालंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.