सेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे. 

Updated: Oct 1, 2014, 05:08 PM IST


 

तुषार ओव्हाळ

झी प्रतिनिधी

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे. शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. भाजपच्या कमळ या चिन्हावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक यांनी निवडणुक लढवली. पण इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभुमीवर ही निवडणूक झाली आणि सहानुभुतीच्या लाटेत काँग्रेस जिंकली आणि भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनाही पराभव स्वीकारावा लागला. 

या परभवाचं विश्लेषण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने भरविलेल्या एका बैठकीत ‘शिवसेनेशी युती केल्यामुळेच भाजपच्या पदरी परभवाची नामुष्की आली’ असा मुद्दा नामवंत कायदेपंडित आणि तेव्हा भाजपचे उमेदवार असलेले राम जेठमलानी यांनी मांडला. जेठमलानी यांच्या या मुद्द्याभोवती मग सारी चर्चा फिरत राहिली आणि पुढच्याच वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेबरोबर न जाण्याचा निर्णय भाजपने घेतला. बाळासाहेबांनी त्या वेळी व्यक्त केलेली ‘मार्मिक’ प्रतिक्रिया होती: ‘कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या!’

१९८८ च्या एप्रिल महिन्यात आग्र्याला भाजपचं अधिवेशन भरलं. तिथं राजकीय ठरावावर बोलताना प्रमोद महाजनांनी ‘राम जन्मभूमी’ प्रश्नास पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. भाजपला आता हिंदुत्वाचा प्रश्न हाती घ्यावाच लागणार, हे स्पष्ट झाल्यावर महाराष्ट्रात वसंतराव भागवत आणि महाजन कामाला लागले. या विषयावरून आपण शिवसेनेशी स्पर्धा करू शकलो नसलो तरी थेट त्यांच्याशी सहकार्य करायला म्हणजेच ‘युती’ करायला काय हरकत आहे, असा मुद्दा हळूहळू पुढे सरकावयला त्यांनी सुरूवात केली आणि याच प्रश्नावर कार्यकर्त्यांचं मत आजमाविण्यासाठी जिल्हावार बैठका सुरू केल्या. विदर्भातील भंडारा या एकमेव जिल्ह्याचा अपवाद वगळता बाकी सर्व जिल्ह्यांतून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी युती झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. 

हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे १९८९ च्या जून महिन्यात झालेली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ऐतिहासिक ठरली. या बैठकीत भाजपने दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं. त्यापैकी एक निर्णय होता विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याचा आणि दुसरा होता महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करण्याचा. 

भाजपने शिवसेनेशी केलेल्या ‘युती’चे शिल्पकार होते प्रमोद महाजन. १९८९ मध्ये सेनेशी झालेली युती पुढे टिकून राहिली, याचं श्रेय महाजन यांचंच होतं. ‘युती’ ला भाजपमध्ये असलेला विरोध मोडून काढणे, सेनेशी झालेली युती पुढे टिकून राहिली, याचं श्रेय महाजन यांचंच होतं. काही वेळा युतीतील मतभेद टोकाला जात. युतीचं सरकार असतानाही या दोन पक्षांतील मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आले होतेच. 

महाराष्ट्रात राजकारण करताना भाजपने जनसंघाच्या काळापासून कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी युती करून सत्तास्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.जनसंघाने संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सहभागी होऊन निवडणुका लढवल्या, त्याचा लाभही पदरात पाडून घेतला. जनसंघाच्या गटाने भाजपच्या रूपाने जेव्हा पुर्नजन्म घेतला, तेव्हा पुलोदच्या सहाय्याने भाजपने निवडणुका लढवल्या. शरद पवारांनी काँग्रेसविरोधी आघाडीतून बाजूला होऊन सरळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी भाजपने शिवसेनेशी युती केली.१९९५ साली युतीचं महाराष्ट्रात सरकार आलं. १९९९ नंतर भाजप-शिवसेना सत्तेतून बाहेर पडले तरी भाजपने शिवसेनेशी युती कायम ठेवली. काँग्रेसविरोधी मतांची बेरीज आणि हिंदुत्वाचं जहाल राजकारण हे या युतीचे आधार होते. दुसरीकडे, इतर राज्यांतील पक्षांसोबत युतीचा आधार हिंदुत्व हा नसला, तरी १९८९ ते १९९८ या दशकभराच्या काळात भाजपने आपलं हिंदुत्वाच राजकारण सर्वत्र पुढे रेटलं ते महाराष्ट्राच्या यशानंतर. १९९६ साली भाजपचे १३ दिवसांत सरकार कोसळले तेव्हा सुध्दा केंद्रात अकाली दल आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भाजपची साथ सोडली नाही 


फाईल फोटो

दोन्ही पक्षांमध्ये मतभेद बऱ्याच वेळेला झाले... 

स्वतंत्र विदर्भ:- स्वतंत्र विदर्भाला भाजपचा पाठिंबा असून शिवसेनेचा विरोध आहे.

मुंबईतील परप्रांतीयांचा प्रश्न:- मुंबईतील परप्रांतीय हिंदी भाषिकांच्या प्रश्नांवरही सेना-भाजपमध्ये मतभेद आहे. मुंबईत येणा-या परप्रांतियाच्या विरोधात शिवसेनेची भुमिका आहे. याउलट हिंदी भाषिक, गुजराती, मारवाडी-राजस्थानी मतदार हे भाजपचे पाठिराखे आहेत.

मनसे:- शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे मनसेमुळे भाजप-शिवसेनेला नवा स्पर्धक तयार झाला. त्याचा फटका भाजपलाही बसला(२००९). मनसेमुळे मतविभागणी होऊन निवडणुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी मनसेशीही आघाडी करण्यात भाजप उत्सुक होता. 

यूपीए उमेदवारांना पाठिंबा : शिवसेना हा NDA चा घटकपक्ष असून त्यांनी प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी या UPA च्या उमेदवारांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला.


फाईल फोटो

१९९९ ते २००९ या १५ वर्षाच्या काळात युती सत्तेपासून दूर होती. २००९ साली शिवसेनेची ताकद खूपच कमी झाली. मुंबईत त्यांचे फक्त ४ आमदार निवडून आले आणि मनसेचे ६ आमदार निवडून आले. शिवसेनेला सत्ता तर मिळाली नाहीच तर त्यांचे विधीमंडळातील विरोधीपक्षनेते पद सुध्दा दोन जागांनी गेले. ते पद भाजपला मिळाले. शिवसेनेला एकूण ४४ जागा मिळाल्या तर भाजपला ४६ जागा मिळाल्या. अवघ्या दोन जागांनी शिवसेनेचे विरोधीपक्षनेते पद हुकले.  २०१२ साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची सत्ता टिकवण्यात शिवसेनेला यश आले. २०११ साली शिवसेनेने रामदास आठवलेंच्या RPI बरोबर युती केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणावरून भीषण दंगली आणि त्यासंबंधातील शिवसेनेची भुमिका जगजाहीर होती. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स’ वरून निर्माण झालेल्या तणावही कोणाच्या विस्मरणातून गेलेला नव्हता. तरी आठवले युतीत सामील झाले. उध्द्व ठाकरे यांनी शिवसेनेची सुत्र हाती घेतल्यावर शिवशक्ती भीमशक्तीची चर्चा सुरू केली होती. ती युती२०११ मध्ये झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या युतीत आणखीन दोन भिडू दाखल झाले. स्वाभिमान चे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर. पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात राजू शेट्टींनी साखर कारखानदार्यांव विरोधात आंदोलने करून आपले अस्तित्व निर्माण केले. रासपचे महादेव जानकर यांच्या मागे धनगर समाज खंबीरपणे उभा आहे. या सर्वांचा फायदा महायुतीला झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४२ खासदार निवडून गेले. 

एकूणच हा युतीचा प्रवास होता. अनेकदा मतभेद झाले पण युती टिकून राहिली. आता युती तुटेल की कायम राहिल हे काळच सांगेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.