शिवसेनेची कोकणात बाजी, भाजपला पाजलं पाणी

राज्यात कोकण वगळता मुंबई, मराठवाडा, विदर्भात भाजपानं विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारलीय. विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेनं भाजपला पाणी पाजलंय.

Updated: Oct 25, 2014, 12:41 PM IST
शिवसेनेची कोकणात बाजी, भाजपला पाजलं पाणी   title=

रत्नागिरी : राज्यात कोकण वगळता मुंबई, मराठवाडा, विदर्भात भाजपानं विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारलीय. विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेनं भाजपला पाणी पाजलंय.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या १५ जागांपैकी केवळ १ जागेवर भाजपचा विजय झालाय. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा कोकणात सेनेची ताकद सिद्ध झाली आहे. कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपला चांगलंच खिंडीत पकडलय. 

रायगडात सात जागा आहेत. त्यापैकी केवळ १ जागेवर भाजपाचा उमेदवार विजयी झालाय. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाला भोपळाही फोडता आलेला नाही. 

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात भाजपच्या सुरेंद्र मानेंचा पराभव शिवसेनेच्या उदय सामंत यांनी केलाय. तर गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विनय नातू यांचा पराभव झाला. कणकवली मतदारसंघातून भाजपचे प्रमोद जठार यांचा पराभव काँग्रेसच्या नितेश राणेंनी केला. सावंतवाडीतून भाजपाच्या राजन तेली यांचा परभाव शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी केला.

रत्नागिरी, गुहागर, कणकवली आणि पनवेल हे विधानसभा मतदारसंघ सोडले तर भाजपाचा एकही चेहरा तसा लोकांच्या परिचयाचा नव्हता. दुसरीकडे भाजपची तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची साखळी नव्हती.  

१९९०पासून कोकणात सेना आणि भाजपची युती आहे. मात्र शिवसेनेच्या ताकदीवर इथं भाजपचं प्रस्थ अवलंबून होतं. या विधानसभेत युतीत फाटाफुट झाल्यानंतर कोकणातली भाजपची खरी ताकद पुन्हा एकदा दिसून आली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या.तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा झाल्या. परंतु त्याचा प्रभाव कोकणात कुठेच पाहायलाच मिळाला नाही.

कोकणात भाजपला आपले पाय घट्ट रोवण्यासाठी पुन्हा एकदा पहिल्यापासून श्रीगणेशा करावा लागेल एवढं मात्र नक्की, असे राजकीय विश्लेषक सांगतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.