मुंबई : शिवसेनेने आमच्यावर केलेल्या टीकेचे शल्य मनात अजून आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
राज्यात सुमारे ६२ टक्के मतदान झाले आहे. त्याचवेळी अनेक एक्झिट पोल आले असून यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा आणि बहुमताची पसंती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. जर पोलनुसार जागा मिळाल्या नाहीत, तर तुम्ही शिवसेनेची मदत घेणार का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता भाजप किंवा आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असे मत व्यक्त केले.
२५ वर्षांची युती तुटल्याने शिवसेना-भाजप प्रथमच स्वतंत्रणपे लढले. तसेच एकमेकांवर निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे युतीतील नेत्यांची मने दुखावली गेली आहेत. शिवसेनेने आमच्यावर केलेल्या टीकेचे शल्य अजुनही मनात आहे, असे फडणवीस म्हणालेत. त्यामुळे सेना-भाजपमधील संघर्ष टोकाला असल्याचे पुन्हा एकदा पुढे आल्याचे दिसत आहे.
अनेक एक्झिट पोल आले तरी १९ तारखेनंतर कोणाला किती जागा मिळतील, हेच स्पष्ट होईल. त्यामुळे पुढील गणिते कशी असतील याची चर्चा सुरु झाली आहे. बहुमत न मिळाल्यास सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या पक्षाला दुसऱ्याची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता लक्ष निकालाकडे लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.