महाराष्ट्रात... हाथी चले अपनी चाल!

गेल्या काही निवडणुकांमधल्या निकालावरुन विदर्भात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव वाढत चालल्याचं दिसून येतंय..गेल्या दोन लोकसभांच्या निकालावरुन तर यंदाच्या विधानसभेत बसपाची भूमिका निर्णायक ठरु शकते.

Updated: Oct 1, 2014, 09:48 AM IST
महाराष्ट्रात... हाथी चले अपनी चाल! title=

नागपूर : गेल्या काही निवडणुकांमधल्या निकालावरुन विदर्भात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव वाढत चालल्याचं दिसून येतंय..गेल्या दोन लोकसभांच्या निकालावरुन तर यंदाच्या विधानसभेत बसपाची भूमिका निर्णायक ठरु शकते.

विदर्भात बसपाचा हत्ती मंद चालीनं आपलं प्रभाव क्षेत्र वाढवत चाललाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातून २५ जागा जिंकण्याचं ध्येय बसपानं ठेवलंय. त्यापैंकी 10 जागांची बसपाची भिस्त केवळ विदर्भावर आहे. गेल्या काही वर्षातल्या लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली तर बसपाच्या वाढत्या प्रभावाची कल्पना येऊ शकते.
 
२००९च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून बसपाच्या माणिकराव वैद्य यांनी एक लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली होती. त्यावेळी भाजपच्या बनवारीलाल पुरोहित यांचा केवळ २४ हजार मतांनी पराभव झाला होता. २०१४ च्या लोकसभेत मोदी लाट असतानादेखील बसपाने ९५  हजारांपेक्षा अधिक मतं मिळवली होती. भाजप आणि काँग्रेस खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बसपाच ठरला होता. 

एकट्या नागपूरमध्ये दलित मतदारांची संख्या तीन लाखांच्या घरात आहे. दलित आणि मुस्लिम मतदारांचा विचार करत बसपाने यावेळीदेखील विदर्भात सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केलाय. त्यामुळं गेल्या काही वर्षात आरपीआय आणि इतर घटक पक्षांचा प्रभाव कमी होऊन बसपाचा प्रभाव वाढताना दिसतोय.

युती आणि आघाडीचा जागावाटपाचा घोळ सुरु असतानाच बसपानं पहिली यादी जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली होती. यंदाच्या विधानसभेत मायावती महाराष्ट्रात एकूण दहा सभा घेणार आहेत. त्यातल्या दोन सभा विदर्भातल्या नागपूर आणि भंडाऱ्यात होणार आहेत.
 
महाराष्ट्रात पंचरंगी लढत होणार असल्यामुळे समर्पित मतदार असणाऱ्या बसपाची भूमिका अधिकच महत्त्वाची बनली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.