15 वर्षं आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आहे. पण राष्ट्रवादीच्या वाट्याला कायम उपमुख्यमंत्रीपदच आलंय... यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार होईल का...?
शरद पवारांचे पुतणे
राजकारणातला रांगडा गडी... रोखठोक नेतृत्व... बोलायला फटकळ... अशी ओळख असणारा राजकारणातला दादा नेता म्हणजे अजित अनंतराव पवार... महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री. शरद पवारांचे पुतणे अशी ओळख त्यांच्या पाचवीलाच पुजलेली... अजित पवारांनी सुरुवातीला बारामतीमध्ये सहकाराच्या माध्यमातून राजकारणाचा श्रीगणेशा केला.
1991 साल अजितदादांच्या राजकारणासाठी महत्त्वाचं ठरलं. याच वर्षी ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. 1991 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते प्रथम विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. पहिल्यांदा आमदार होताच पवारकाकांच्या पुण्याईनं त्यांना राज्यमंत्रीपदही मिळालं. आणि 1991 सालीच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी ते लोकसभा खासदारही होते. तेव्हापासून आजतागायत अजितदादांनी राजकारणात मागे वळून पाहिलेलं नाही. विधानसभेत १९९१, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ असे सलग पाच वेळा ते बारामतीमधून आमदार म्हणून निवडून आले. 1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता राज्यात आल्यापासून मंत्रिमंडळात ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, फलोत्पादन, पाटबंधारे, ऊर्जा, अर्थ आणि नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली
पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची अजित पवारांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी अनेक वेळा ही बाब स्पष्टपणं बोलून दाखवलीय. खरं तर 2004 मध्येच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सत्तास्थानी बसू शकला असता. कारण त्या निवडणुकीत काँग्रेसचे 69, तर राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले होते. संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा होता. मात्र पडद्याआड बरंच काही घडलं. काँग्रेसकडून राष्ट्रवादीनं जादा मंत्रीपदं पदरात पाडून घेतली, पण मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं... अजित पवारांची मुख्यमंत्री बनण्याची चालून आलेली संधी हुकली... 11 नोव्हेंबर 2010 रोजी ते राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. पण त्यासाठी देखील आपल्या समर्थक आमदारांमार्फत त्यांना शरद पवारांवर दबाव टाकावा लागला.
पवारकाकांपासून काय शिकणार ?
1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासूनच शरद पवारांचे पुतणे म्हणून अजित पवारांचा एक वेगळा दबदबा आणि स्थान राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आपल्या समर्थक आमदारांचा एक मोठा गट तयार केलाय. अजितदादांचा रांगडा आणि ग्रामीण बाज हा ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावतो. मात्र त्यांचा फटकळ स्वभाव आणि कधी काय बोलावं याचं नसलेलं भान, हे त्यांच्या राजकीय प्रगतीच्या आड येतं. टगेगिरीचं समर्थन आणि पाऊस पडत नसेल तर धरणात मुतायचं का? अशा वादग्रस्त वक्तव्यांचा किती मोठा फटका बसतो, हे त्यांनी वारंवार अनुभवलंय... पण त्यातून काही धडा शिकतील, तर ते अजितदादा कसले...? शरद पवारांच्या सावलीत राजकारण करणा-या अजित पवारांनी, शरद पवारांकडून काही चांगले गुण आत्मसात करायला हवे होते. शरद पवारांचे उद्योग, साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्रीचे संबंध आहेत. शरद पवार कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी आदराने वागतात. मात्र अजित पवार फारसे कुणात मिसळत नाहीत, कार्यकर्ते-नेत्यांशी ते फटकून वागतात. या स्वभावामुळं त्यांनी अऩेकांना दुखावलं आहे. तरीही मुख्यमंत्रीपद हे टार्गेट ठेवून राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य अजित पवारांनी ठेवलंय. मात्र त्यांच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे तो पवारकाकांचाच.. अति महत्त्वाकांक्षी पुतण्याला मुख्यमंत्री बनण्याची संधी पवारकाका देतील का, हा या घडीचा सर्वात मोठा सवाल आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.