नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात आयोजित केला जाणाऱ्या सैफई महोत्सवाची खूप चर्चा होते. ती यावर्षीही होतेय... परंतु, यावेळी बॉलिवूड स्टार रणवीर सिंहला मात्र ही चर्चा भारी पडणार असंच दिसतंय.
त्याचं झालं असं की या कार्यक्रमात 'बाजीराव'फेम रणवीर सिंह परफॉर्मन्स देत होता. गाण्यावर नाचता-नाचताच जोशमध्ये रणवीर अचानक स्टेजवरून खाली उतरला आणि त्यानं मुलायम सिंह यांच्याकडे धाव घेतली.
तो जाऊन मुलायम सिंह यांच्या पायाशी बसला... त्यांचे आशीर्वादही घेतले त्यानंतर मुलायम यांच्या हाताला एक हलकासा किस घेतला... यानंतर मुलायम सिंह यांनी रणवीरच्या पाठीवरही हात ठेवला.
यानंतर रणवीर वळला तो उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे... जुने मित्र भेटावेत अशा पद्धतीनं त्यानं अखिलेश यांच्यासोबत हाय फाईव्ह केला.
नाचता नाचताच तो अखिलेश यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांच्यासमोर दाखल झाला... इथं त्यानं डिंपल यांनाही नाचवण्याचा प्रयत्न केला... पण, या कार्यक्रमाची मजा लुटणाऱ्या डिंपलनं त्याला फार 'एन्टरटेन' केलं नाही. त्यामुळे, डिंपलचा हात आपल्या डोक्यावर लगावत रणवीर पुन्हा एकदा स्टेजवर चढला.
त्यानं असं का केलं हे माहीत नाही... पण, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय... त्याच्यावर टीकाही होतेय.
उल्लेखनीय म्हणजे, रणवीर सिंहशिवाय इथं सैफ अली खान, करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कलाकारांना येण्या-जाण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली जाते. २६ डिसेंबर रोजी सुरु झालेला हा महोत्सव १७ दिवस सुरु होता.