मुंबई: मराठी सिनेनाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांचं रविवारी रात्री वरळी इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्यांचं वय ६४ वर्षे होते. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेनाट्यसृष्टीवर शोककळा पसरली.
गेली अनेक वर्षे नयनतारा मधुमेहाच्या विकारानं त्रस्त होत्या. आठ वर्षांपूर्वी त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता. आज रात्री उशिरा त्यांना अत्यवस्थ वाटू लागलं आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. नयनतारा यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता वांद्रे इथल्या वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
प्रकृतिअस्वास्थ्यामुळं नयनतारा गेली १० वर्षे सिनेनाट्यसृष्टीपासून दूर होत्या. त्यांनी माऊली प्रॉडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या होत्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी त्यांचं चांगलं ट्यूनिंग जमल्यानं त्यांचं ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक सुपरहिट झालं.
त्यानंतर नाटक आणि सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या आईची अनेकदा भूमिका केल्यानं त्या लक्ष्याची आई म्हणून ओळखल्या जात होत्या. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ आणि ‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या लक्षात राहिल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.