मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. संगीत नाटकांच्या काळात पेंढारकरांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्याकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संगीत मानापमान, संगीत सौभद्र अशा अनेक नाटकामध्ये भालचंद्र पेंढारकरांनी आपल्या अभिनयानं छाप पाडली.
ललितकला दर्श नावाची संस्था स्थापन करून त्यांनी नाट्य क्षेत्राची आयुष्यभर सेवा केली. दुरितांचे तिमीर जावो, पंडितराज जगन्नात ही त्यांची विशेष गाजलेली नाटके आहेत.
नाट्यक्षेत्रातील योदगादानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. विष्णुदास भावे पुरस्कार (१९७३), बालगंधर्व पुरस्कार (१९८३), केशवराव भोसले पुरस्कार (१९९०), जागतिक मराठी परिषद (१९९६), संगीत नाटक कला अकादमी (२००४), तन्वीर पुरस्कार (२००५) असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले तर २००६ साली त्यांना चतुरंग जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान, सकाळी साडे अकरा वाजता भालचंद्र पेंढारकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी यशवंत नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.