शाहरुख खान यापुढे रोहित शेट्टीसोबत काम नाही करणार ?

दिलवालेचा बॉक्स ऑफिसवरचा परिणाम आल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की आता शाहरुख खान आणि रोहित शेट्टी पुन्हा सोबत काम करणार की नाही? याला कारणही तसेच आहे. फ्लॉप सिनेमे बनवणा-या दिग्दर्शकांसोबत शाहरुखने काम करण्याची हिंमत पुन्हा दाखविलेली नाही. 

Updated: Dec 28, 2015, 10:07 PM IST
शाहरुख खान यापुढे रोहित शेट्टीसोबत काम नाही करणार ? title=

मुंबई : दिलवालेचा बॉक्स ऑफिसवरचा परिणाम आल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की आता शाहरुख खान आणि रोहित शेट्टी पुन्हा सोबत काम करणार की नाही? याला कारणही तसेच आहे. फ्लॉप सिनेमे बनवणा-या दिग्दर्शकांसोबत शाहरुखने काम करण्याची हिंमत पुन्हा दाखविलेली नाही. 

शाहरुख खानच्या करिअरवर नजर टाकली तर राकेश ऱोशनचा किंग अंकल हा त्याचा सुरुवातीचा सिनेमा होता. किंग अंकल चालला नाही तरी शाहरुखने राकेश रोशनच्या करण अर्जुनमध्ये काम केले जो बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झाला. करण अर्जुननंतर राकेश रोशनचा पुढचा सिनेमा कोयला होता. ज्याची घोषणा सनी देओलला घेऊन झाली होती. शाहरुखने या सिनेमासाठी हट्ट केला आणि राकेश रोशन यांनी सनीला हटवून त्याला हिरो बनविले. परंतु कोयला सुपरफ्लॉप ठरला आणि शाहरुखला पुढच्या सिनेमाची कथा एकवण्यासाठी राकेश रोशन दोन वर्ष इकडे तिकडे भटकले. मात्र शाहरुखने कथा एकलीच नाही. 

शोले फेम दिग्दर्शक रमेश सिप्पींनी शाहरुखसोबत जमाना दिवाना बनविला तेव्हा शाहरुख त्यांचे कौतूक करतांना थकत नव्हता. मात्र चित्रपट चालला नाही आणि रमेश सिप्पीच्या पुढच्या सिनेमात काम करायला शाहरुखला वेळ मिळालाच नाही. याचप्रकारे अंजाम फ्लॉप झाल्यावर राहुल रवैलपासून शाहरुख लांब गेला. 

देवदासचा किस्सा जगजाहीर आहे. देवदासमध्ये पहिल्यांदाच शाहरुखने संजयलीला भंसाळीसोबत काम केले. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले नाही. मात्र भंसाळींसोबत शाहरुखची जवळीकता वाढली. मात्र सावरिया आणि त्यानंतर बाजीराव-मस्तानीनंतर  संजयलीला भंसाळी आणि  शाहरुखमध्ये दुरावा आला. त्यामुळे दिलवालेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे शाहरुख आता रोहित शेट्टीपासून लांब जाईल अशी चर्चा आहे. आता शाहरुख आणि रोहित शेट्टी पुन्हा एकत्र काम करणार का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.