मुंबई : अरे श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतो तशी मनाला घाण लागू नये म्हणून जप असे साने गुरूजींच्या आईने त्यांना लहानपणी सांगितले होते. तसेच काहीसे वक्तव्य बॉलीवुडचा किंग शाहरुख खान याने करून पुन्हा एकदा श्यामच्या आईची आठवण करून दिली आहे.
हातमोजे घालून रस्त्यावर झाडू मारणे आणि त्याची प्रसिद्धी करणे थोडसे विचित्र वाटते. त्यापेक्षा मनाची स्वच्छता मला अधिक महत्त्वाची वाटते, असे मत शाहरूख खानने गुरुवारी व्यक्त केले. मोदींच्या स्वच्छता अभियानावर शाहरूखने अप्रत्यक्ष टीका केली आहे. सानिया मिर्झा हीने शाहरुखला स्वच्छता कार्यक्रमासाठी नॉमिनेट केले होते. एका कार्यक्रमात स्वच्छता अभियानाबाबतच्या प्रश्ना,ला तो उत्तर देत होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन ‘सेलिब्रिटी’ मंडळींना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमिताभ बच्चन, सलमान खान, हृतिक रोशन यांनी मोहिमेत भाग घेतला होता. झाडू हातात घेऊन रस्त्यांवर साफसफाई करताना त्यांची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्ध झाली होती.
शाहरूख म्हणाला, ‘हृदय स्वच्छ असले पाहिजे, त्यात द्वेष असता कामा नये. माझे हृदय स्वच्छ आहे. मात्र बोलण्यावर ताबा नाही; त्यामुळे जीभ अस्वच्छ आहे. एक दिवस सगळ्याच वाईट गोष्टींना मी दूर सारीन. ‘स्वच्छ भारत’ अभियानातील कलाकारांच्या सहभागाबाबत त्याने समाधान व्यक्त केले. यामुळे जनजागृती होईल’, असे सांगत त्याने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.