पुणे: बेकादेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय. मात्र त्यानं पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला आहे. संजय दत्तनं तुरुंग प्रशासनाकडे १४ दिवसांच्या संचित रजेसाठी (फरलो) अर्ज केला असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
१९९३च्या बाँबस्फोटात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झाली असून सध्या तो येरवडा तुरुंगात आहे. गेल्या वर्षी कधी स्वतःची प्रकृती तर कधी पत्नी मान्यताच्या प्रकृतीचं कारण पुढं करत संजय दत्त तुरुंगातून बाहेर आला होता. आता पुन्हा एकदा संजय दत्तनं १४ दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केला आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच संजय दत्तच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल, असं तुरुंग प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
आघाडी सरकार असताना संजय दत्तला वारंवार सुट्टी मिळत असल्यानं भाजपा आणि अन्य पक्षांची टीका केली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील हे टीकेचं लक्ष्य ठरत होते. संजय दत्तला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोपही भाजपानं केला होता. आता राज्यात भाजपाची सत्ता असून गृहखातं स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळं आता संजूबाबावर भाजपाही कृपादृष्टी दाखवेल का याविषयी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, संजय दत्तची भूमिका असलेला आमीर खानचा 'पीके' येत्या १९ डिसेंबरला रिलीज होतोय. त्यासाठी तर संजय दत्त सुट्टी मागत नाहीय ना, अशी चर्चा सुरू झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.