'ए दिल है मुश्किल'मध्ये फवादऐवजी दिसणार सैफचा चेहरा?

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखीन ताणले गेले आहेत.

Updated: Oct 10, 2016, 03:58 PM IST
'ए दिल है मुश्किल'मध्ये फवादऐवजी दिसणार सैफचा चेहरा? title=

मुंबई : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखीन ताणले गेले आहेत. पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये काम करून देणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली. एवढच नाही तर भारतामध्येही पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटांमध्ये घेण्याबाबत भारतीय नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.

भारतीयांच्या या रोषाचा फटका चित्रपटांना बसू नये म्हणून निर्माते-दिग्दर्शक भलतेच सावध झाले आहेत. ए दिल है मुश्किल या चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आहे. या चित्रपटातून आता फवाद खानचा चेहरा गूल व्हायची शक्यता निर्माण झाली आहे. ए दिल है मुश्किलचा निर्माता आणि दिग्दर्शक या चित्रपटामध्ये फवाद खानऐवजी सैफअली खानचा चेहरा दाखवणार असल्याचं बोललं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

ए दिल है मुश्किल 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. एवढ्या कमी वेळेत चित्रपटाचं पुन्हा शूटिंग करणं शक्य नसल्यानं ग्राफिक्सच्या मदतीनं फवाद खानऐवजी सैफचा चेहरा लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे शाहरूख खानच्या बहुचर्चित 'रईस' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. माहिराऐवजी या भूमिकेसाठी दुस-या अभिनेत्रीचा शोध आता सुरू झाला आहे.  त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणारा हा सिनेमा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. कारण नवीन अभिनेत्रीला घेऊन या सिनेमाचं पुन्हा चित्रीकरण करावं लागणार आहे.