मुंबई : प्रेक्षकांना ज्याची अनेक वर्षापासून प्रतिक्षा आहे, असं पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडची अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एका पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. यापूर्वी यश चोप्रांच्या १९८१ साली आलेल्या 'सिलसिला' या चित्रपटात अमिताभ आणि रेखा एकत्र दिसले होते.
मात्र, आता आर.बाल्कीच्या 'शमिताभ' या चित्रपटात हे दोघेजण एकत्र येण्याचा चमत्कार पहायला मिळू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांना तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पहायला मिळण्याची शक्यता आहे. तामिळ सुपरस्टार आर.धनुष या चित्रपटात एका मुकबधिराची भूमिका साकारणार असून, त्याने नुकतेच रेखा यांच्याबरोबरचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे.
मात्र, 'शमिताभ'मध्ये अमिताभ आणि रेखा यांची एकत्रित दृश्ये चित्रित केली जाणार की नाही, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. अमिताभ-रेखा यांच्या जोडीने 'दो अनजाने' (१९७६)मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी 'मुक्कदर का सिकंदर' (१९७८), 'मि.नटवरलाल' (१९७९), 'सुहाग' (१९७९), 'सिलसिला' (१९८१) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, काही वर्षांपासून वैयक्तिक कारणांमुळे दुरावलेली ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची आशा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.