नवी दिल्ली : तब्बल ६५० कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या 'पीके' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'पीके'साठी 'फरिश्ता'ची स्टोरी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस बजावली आहे.
'पीके' सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमाला विरोध झाला होता. या सिनेमात प्रमुख भूमिका अभिनेता आमिर खानची आहे.'फरिश्ता' या पुस्तकाचे लेखक कपिल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
कपिल यांच्या 'फरिश्ता' या हिंदी पुस्तकातील पात्रे, प्रसंग आणि कल्पना 'पीके'मध्ये चोरण्यात आली असल्याचा दावा त्यांनी याचिकेतून केलाय. त्यावरूनच न्या. नज्मी वझिरी यांनी विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि चित्रपटाचे पटकथा लेखक अभिजात जोशी यांना नोटीस बजावली आहे. १६ एप्रिलला उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारपुढे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी आपली बाजू त्यावेळी मांडावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्ते कपिल यांनी त्यांच्या पुस्तकातील प्रसंग आणि कल्पना चोरल्याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांकडून एक कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या नामावलीमध्ये कपिल यांचे नावही समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.