मुंबई : जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.
नमस्ते आराध्या,
नमस्ते नव्या नवेली,
एका मोठ्या परंपरेचा वारसा तुम्हा दोघींना तुमच्या नाजूक खांद्यावर घ्यायचाय.... आराध्या, तुला तुझे पणजोबा हरिवंशराय बच्चन यांचा वारसा जपायचाय आणि नव्या, तुला तुझे पणजोबा एच. पी. नंदा यांचा वारसा समर्थपणे पेलायचाय. तुम्हा दोघींना प्रसिद्धी आणि समृद्धी तुमच्या आडनावांनीच बहाल केलीय.
नंदा किंवा बच्चन... पण सगळ्यात आधी तुम्ही दोघी मुली आहात. आणि तुम्ही मुली आहात म्हणूनच, लोक तुमच्यावर काही विचारांची, सीमारेषांची बंधनं घालतील, तुम्ही कुठले कपडे घालायचे, कसं वागायचं, कुठे जायचं, कुणाला भेटायचं हे सगळं कदाचित लोकं ठरवतील. पण लोकांनी दाखवलेल्या मार्गावर कधीच सावल्यांसारखे धावू नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि तेही शहाणपणानं घ्या.
तुमच्या स्कर्टच्या लांबी-रुंदीवरुन तुमच्या चारित्र्याची मापं लोकांना ठरवू देऊ नका.... तुम्हाला वाटेल तेव्हाच आणि त्याच्याशीच लग्न करा... लग्नासाठी आणखी कुठलीच कारणं नकोत.... लोक बरंच काही बोलतील.... भयानक आणि विचित्र गोष्टीही सांगतील.... पण लोक काय म्हणतील, याचा विचार मुळीच करु नका.... शेवटी तुम्ही जे कराल, त्याचे परिणाम तुम्हालाच भोगायचेत.... तुमचे आयुष्याचे निर्णय तुम्हीच घ्या.... नव्या, तुला घराण्याचा कितीही समृद्ध वारसा लाभला असला तरी स्त्री म्हणून तुझ्या जगण्यात येणा-या अडचणी बदलणार नाहीत.
आराध्या, जेव्हा तुला हे पत्र मिळेल किंवा यामधल्या गोष्टी कळतील, तेव्हा मी कदाचित तुझ्या आजूबाजूला नसेन. पण मी आज या पत्रात जे लिहिलंय, ते पुढच्या काही वर्षांनंतरही लागू असेल. स्त्री म्हणून जगणं कठीण आहे, तुमचे मार्ग तुम्ही निवडा, तुमचं ध्येय गाठा. पण तरीही तुम्ही जगापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करा. मला जगानं अमिताभ बच्चन म्हणून ओळखण्यापेक्षा तुमचे आजोबा म्हणून जगात माझी ओळख झालेली मला जास्त आवडेल.
तुझा दादाजी
तुझा नाना