रायपूर : तुम्हाला राज कपूरच्या 'मेरा नाम जोकर' या सिनेमातला जोकर आठवतोय का?... हो तोच... 'जिना यहाँ, मरना यहाँ' म्हणणारा... 2 फूट उंचीचा... जोकर... आता, मात्र वयाची पासष्टी ओलांडलेला हाच कलाकार या वयातही हालअपेष्ठाच झेलतोय.
छत्तीसगढी चित्रपट 'राम बनाही जोड़ी'च्या विशेष स्क्रिनिंगमध्ये फक्त 2 फूटचे 65 वर्षीय नथू दादाही उपस्थित होते. या, लघुपटात नथू दादाच मुख्य भूमिकेत दिसतात. छत्तीसगडमधल्या राजनांदगाव जिल्ह्याचे नत्थू दादा रामटेके म्हणतात, 'आज आम्ही सगळे बटू (कमी उंचीचे लोक) स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी झटतोय... जर आमचं कुणी राजकारणात असतं तर कदाचित ही स्थिती वेगळी असती'
नत्थू दादांनी 'मेरा नाम जोकर' सहित धर्मात्मा, छोटे मियां, अनजाने, कसमें वादे, जियो शान से सारख्या जवळपास 150 चित्रपटांत काम केलंय. आपल्या उंचीमुळे आणि अभिनय क्षेत्रातील कामामुळे आपल्या नावाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' नोद केली जावी अशी नत्थू दादांची इच्छा आहे... यासाठी ते मुख्यमंत्र्यांसहीत अनेक अधिकाऱ्यांच्या पायऱ्या चढलेत... पण, त्यांची ही इच्छा मात्र अजूनही पूर्ण झालेली नाही.
राज कपूर यांच्याशी पहिली भेट...
केवळ 2 फूट उंची असलेल्या राम नथू यांनी आता वयाची 65 वर्ष पूर्ण केलीत... पण, ते अजूनही राज कपूर यांच्याशी झालेली पहिली भेट विसरू शकलेले नाहीत. नथू दादा म्हणतात की, 'तो दिवस मी कधीच विसरणार नाही जेव्हा प्रथम माझी राज कपूर यांच्याशी भेट झाली... ते मला पाहून एकदम म्हणाले... वाह... मिल गया मेरा जोकर'... यावेळी, राज कपूर 'मेरा नाम जोकर' चित्रपटावर काम करत होते.
चित्रपटात एन्ट्री...
नथू दादांचा चित्रपटसृष्टीत कसा प्रवेश झाला याचा किस्साही मनोरंजक आहे... ते सांगतात, 'दारा सिंग जेव्हा भिलाईत आले होते तेव्हा मीही त्यांना भेटायला गेलो होतो... तेव्हा मी 17 वर्षाचा असेन... त्यावेळेस त्यांनी मला विचारले, चित्रपटात काम करशील? आणि मी लगेच हो म्हणून टाकलं'... नथू दादा दहावीपर्यंत शिकलेत पण त्यांना बालपणापासूनच चित्रपटात काम करण्याचा छंद होता, असंही त्यांनी सांगितलंय.
उतारवयाकडे झुकलेल्या नत्थू दादांना आजही बॉलीवूडसहीत छॉलिवूडच्या चित्रपटांत काम करण्यासाठी विचारणा होते... पण, शरीर साथ देत नाही... ही खंत त्यांना खायला उठतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.