मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोटा दरम्यान अवैध हत्यारं बाळगणारा अभिनेता संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच 'गुड बॉय' बनून तुरुंगातून बाहेर येण्याच्या चर्चेला मंगळवारपासून जोरदार हवा मिळत होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी मात्र संजय दत्तचा याबद्दलचा अर्ज फेटाळून लावलाय.
यामुळे संजय दत्तचा तुरुंगातला मुक्काम मात्र लांबणीवर पडलाय. यापूर्वी, संजय दत्तची शिक्षा कमी करण्याचा अर्जाला गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, आता रणजीत पाटील यांनीच संजय दत्तची शिक्षा कमी करण्याचा अर्ज राज्यपालांनी फेटाळल्याची माहिती दिलीय.
कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेनुसार, संजय दत्त ऑक्टोबर महिन्यात सुटणार आहे. परंतु, नियमांनुसार कोणत्याही कैद्याला ११४ दिवसांपूर्वीच काही अटींच्या पूर्ततेच्या अटीवर शिक्षेत सूट मिळू शकते.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी संजय दत्त दोषी ठरला होता. त्यानंतर त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुनावणीनंतर २०१३ मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगतोय.
कोर्टानं संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. यातील त्यानं १८ महिने अगोदरच तुरुंगात काढले होते. त्यामुळे, केवळ साडे तीन वर्षांची शिक्षा त्याला भोगायची होती. संजय दत्तनं जवळपास २ वर्ष ९ महिन्यांची शिक्षा पूर्ण केलीय. या दरम्यान तो अनेकदा फर्लोवर सुट्टी मिळवून बाहेरही आला होता. तसंच त्यानं फर्लोच्या कायद्याचं उल्लंघनही केलं होतं.