फिल्म रिह्यू : मानवी स्वभावाचे रंग दाखवणारा 'अग्ली'!

अग्ली

Updated: Dec 27, 2014, 03:29 PM IST
फिल्म रिह्यू : मानवी स्वभावाचे रंग दाखवणारा 'अग्ली'! title=

चित्रपट : अग्ली

दिग्दर्शक : अनुराग कश्यप

कलाकार : राहुल भट, रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी कोल्हापुरे, विनीतकुमार सिंग

वेळ :  १२८ मिनिटे 

मुंबई : एकाच वेळेस प्रेक्षकांच्या डोक्यात अनेक भुंगे निर्माण करण्यासाठी अनुराग कश्यप ओळखला जातो... त्याच्या सिनेमांत एकाच वेळेस कित्येक कथा एकसाथ पुढे सरकत असतात... प्रेक्षकांच्या समोर एकाच व्यक्तीचे अनेक चेहरे उभे करण्याचा नेहमीच अनुरागचा प्रयत्न दिसून येतो... ‘अग्ली’ हा सिनेमाही याच पठडीतला... अनुरागचे अनेक सिनेमे ‘डार्क’ म्हणावे असेच असतात... पण, अग्ली कथा मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते. अनेकदा राजकीय ड्रामा सादर करणारा अनुराग यावेळेस मात्र मानवी भाव-भावनांसहीत नात्यांतील गुंतागुंत घेऊन आलाय. 

काय आहे कथानक...
या कथेतलं एक मुख्य पात्र आहे एक १० वर्षांची चिमुरडी... या मुलीचं अपहरण होतं... एक स्ट्रगलर अभिनेता राहुल (राहुल भट्ट) हा तिचा पिता आहे तर नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेली शालिनी (तेजस्विनी कोल्हापुरे) तिची आई आहे. राहुलशी घटस्फोटानंतर शालिनीनं एका पोलिसाशी म्हणजेच शौमिक बोसशी (रोनित रॉय) विवाह केलाय. 

कथा सुरु होते ती मुलीच्या अपहरणापासून... आणि मग प्रत्येक पात्राचा भूतकाळ कथेतून उलगडत जातो. पहिल्याच सीनपासून ही कथा प्रेक्षकांना धरून ठेवते... पुढे काय होणार? याची उत्सुकता कायम राहते. 

बॉलिवूड सिनेमांमध्ये ठासून भरलेला मसाला या सिनेमात मात्र दिसत नाही... लाऊड म्युझिक, त्यावर थिरकणाऱ्या सेक्सी बायका... अशा अनावश्यक गोष्टी दिसत नाहीत... फिल्मचा शेवट मात्र प्रेक्षकांना धक्का देऊन जाण्यात यशस्वी ठरतो.

कलाकार 
अनुरागची एक खासियत म्हणजे त्याच्या सिनेमांत बॉलिवूड स्टार्सपेक्षा अभिनेते-अभिनेत्री दिसून येतात. ही गोष्ट ‘अग्ली’मध्येही दिसून येते. स्ट्रगलिंग अभिनेता म्हणून राहुल भट्टचं काम जबरदस्त आहे... आपली भूमिका त्यानं ठळ्ळकपणे दाखवून दिलीय. व्यथीत आणि अतृप्त मध्यमवर्गीय पत्नीच्या भूमिकेत तेजस्विनीनंही कुठलीही कसर बाकी ठेवली नाही... तर संपूर्ण सिनेमात एका कडक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा रोनित रॉयही भाव खाऊन गेलाय. याशिवाय अभिनेत्री सुरवीन चावला एका आयटम गर्लच्या भूमिकेत दिसते. 

शेवटी काय तर...
उल्लेखनीय म्हणजे, यावर्षी प्रदर्शित झालेला ‘अग्ली’ हा शेवटचा सिनेमा ठरतोय. जवळपास पाच करोडोंचा खर्च करून बनलेला ‘अग्ली’ वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात चांगली कमाई करेल, अशी आशा आहे. एव्हाना, अनुरागचाही वेगळा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झालाय. खरोखरच्या समाजाचं चित्रण ज्यांना पडद्यावर पाहायला आवडतं अशा प्रेक्षकांसाठी हा सिनेमा आहे, असं म्हणायला हरकत नाही.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.