कसा आहे सनीचा घायल वन्स अगेन ?

1990 मध्ये सनी देवलच्या घायलाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि 25 वर्षानंतर सनी पुन्हा एकदा घायल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला.

Updated: Feb 5, 2016, 05:11 PM IST
कसा आहे सनीचा घायल वन्स अगेन ? title=

मुंबई : 1990 मध्ये सनी देवलच्या घायलाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि 25 वर्षानंतर सनी पुन्हा एकदा घायल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला. घायल वन्स अगेन या सिक्वलचं लिखाण, अभिनय आणि डायरेक्शन खुद्द सनी देवलं केलं आहे. सनीच्या या प्रयत्नानंतर अखेर घायल वन्स अगेन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

काय आहे कहाणी ?
ही कहाणी आहे व्यावसायिक राज बंसल (नरेंद्र झा) आणि सत्यकाम मीडियाचा संचालक अजय मेहरा म्हणजेच सनी देवल यांच्यातल्या वादाची. राज बंसल तरुणांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करतो, तर अजय या तरुणांबाबतच सत्य पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात ओम पुरीनं पोलिसाचं, तर सोहा अली खाननंही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चित्रपटाची कहाणी अत्यंत साधारण आहे. घायल वन्स अगेन म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय. जे आपण गेले कित्येक वर्ष पडद्यावर बघतच आलो आहोत. 

या चित्रपटामध्ये 25 वर्षांपूर्वीच्या घायलमधले काही फ्लॅशबॅकही दाखवण्यात आलं आहे. सनी देवलचा चित्रपट म्हणजे डायलॉग आणि ऍक्शनची मेजवानी. या चित्रपटामध्ये ऍक्शन तर भरभरून आहे, पण आठवणीत राहतील असे डायलॉग मात्र नाहीत. स्क्रीप्टही जास्त खेचलेली आणि वास्तवापासून दूर वाटते. पण दमदार ऍक्शनसाठी दिग्दर्शकांनी मेहनत घेतल्याचं दिसतं. 

कसा आहे अभिनय ?

ओम पुरी, सोहा अली खान, टिस्का चोप्रानी आपला अभिनय चोख केला आहे. पण सनी देवल मात्र त्याच्या रोलमध्ये नसल्याचं काही वेळा जाणवतं. व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या नरेंद्र झा यांनी मात्र आपल्या अभिनयाला चांगला न्याय दिला आहे.

स्क्रीप्टनं वाट लावली
सनी देवलच्या या प्रयत्नांची स्क्रीप्टनंच माती केली का हा प्रश्न घायल वन्स अगेन बघताना वारंवार उपस्थित होतो. तरुणांवर फोकस असलेल्या या चित्रपटाच्या स्क्रीप्टला न्याय देता आला असता, जे मिस करण्यात आलं आहे.  त्यामुळे तुम्ही फक्त सनी देवलचे चाहते असाल तरच घायल वन्स अगेन बघायला जा.