मुंबई : सुजय डहाके दिग्दर्शित, केतकी माटेगावकर, मदन देओधर स्टारर फुंतरु हा सिनेमाही सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. कसा आहे हा सिनेमा...? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट ठरणार की फ्लॉप...? काय आहे सिनेमाची गोष्ट? काय आहे फुंतरु या सिनेमाची ट्रु स्टारी... चला तर पाहुयात...
अभिनेत्री केतकी माटेगावकर,मदन देउधर स्टारर, सुजय डहाकेचा दिग्दर्शित फुंतरु हा सिनेमा एक सायन्स फिक्शन आहे. इंजिनियरींग शिकणाऱ्या पाच तरुणांची ही गोष्ट...
विरा या तरुणाचं अनया या मुलीवर प्रचंड प्रेम असतं. अनया मात्र त्याला अजिबात भाव देत नाही. पण अनयाला कुठल्याही किंमतीत मिळवणं हा विरासाठी एक प्रकारे हट्ट होउन बसतो. विरा इंजिनियरमध्ये माहीर असल्यामुळे 'हॉलॉग्राम' या सायन्समार्फत तो अनयाला मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिच्याचसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका हॉलोग्रामची निर्मिती तो करतो... त्यानंतर काय घडतं... या पुढची कथा आम्ही सांगणार नाही... कारण ते पहायला तुम्हाला चित्रपटगृहापर्यंत जावंच लागेल.
दिग्दर्शक सुजय डहाकेनंच सिनेमासाठी संवाद आणि स्क्रीनप्ले लिहलाय. त्यानं सिनेमा दिग्दर्शित करताना इंजिनियरींग शिकत असणाऱ्या किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अँगलनेच विचार केलाय, असं जाणवत राहतं.
विशेष करुन सिनेमातले संवाद जे खूपच आधुनिक आणि टेक्नोसॅव्ही वाटतात. सिनेमाचं चित्रीकरण चांगलं झालंय. अभिनेता मदन देवधर आणि केतकी माटेगावकर या दोघांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत. दिग्दर्शिक सुजय डहाकेनं सिनेमाच्या विषयाप्रमाणेच सिनेमाला योग्य अशी ट्रीटमेन्ट दिली आहे.
फुंतरु या सिनेमाचा पूर्वार्ध थोडा स्लो वाटतो. सिनेमा पाहताना पुढे काय होणार आहे, याचा अंदाज बांधता येतो. कदाचित म्हणूनच इंटरव्हलच्या आधी सिनेमा थोडासा कंटाळवाणा झालाय...
सिनेमात ग्राफीक्स आणि व्हीएफएक्सचा भरपूर वापर दिसून येतो. हे सगळे प्रयोग छान झालेत. सिनेमाचं संगीतही सुंदर झालंय. तेव्हा हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही फुंतरु या सिनेमाला देतोय तीन स्टार्स...