फिल्म रिव्ह्यू : 'फाईन्डिंग फॅनी'ची धम्माल रोड ट्रीप!

बॉलिवूडच्या मसाला फिल्म्स पाहून बोअर झाला असाल तर थोडी हटके फिल्म पाहण्यासाठी ‘फाईन्डिंग फॅनी’चा ऑप्शन तुम्ही नक्की निवडू शकता. 

Updated: Sep 12, 2014, 12:33 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'फाईन्डिंग फॅनी'ची धम्माल रोड ट्रीप! title=

सिनेमा : फाईन्डिंग फॅनी
दिग्दर्शक : दिनेश विजन
लेखक : होमी अदजानिया, केरसी खंबाटा
कलाकार : अर्जुन कपूर, दीपिका पादूकोण, डिंपल कपाडीय, नसरुद्दीन शाह, पंकज कपूर
वेळ : 102 मिनिट

मुंबई : बॉलिवूडच्या मसाला फिल्म्स पाहून बोअर झाला असाल तर थोडी हटके फिल्म पाहण्यासाठी ‘फाईन्डिंग फॅनी’चा ऑप्शन तुम्ही नक्की निवडू शकता. या सिनेमाद्वारे दिग्दर्शक होमी अदजानियानं स्वत:ला सिद्ध केलंय, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सुरुवातीपासून शेवटापर्यंत आपल्या लक्ष्यापासून भटकताना सिनेमा दिसत नाही. अदजानियानं ‘कॉकटेल’ सिनेमातून प्रेक्षकांना जी डोकेदुखी दिलीय, ती या सिनेमातून दूर करण्यासाठी पुरेशी ठरू शकते. 

सिनेमाचं ढोबळ कथानक...
‘फाईन्डिंग फॅनी’ सिनेमाचं कथानक सुरु होतं गोव्याच्या ‘पोकोलिम’ नावाच्या एका गावातून... जगायला काही कारणच उरलेलं नाहीय, असं मानून चालणाऱ्या काही लोकांवर बेतलेली ही कथा... पण, एका साध्या रोड ट्रीपमुळे या सगळ्यांना जगण्यासाठी कारण सापडतं... 

एंजी (दीपिका पादूकोण) या सिनेमात एका तरुण विधवेची भूमिका साकारतेय... लग्नाच्या दिवशीच केक खाऊन तिच्या पतीचा मृत्यू झालाय. यानंतर ती तिची सासू रोजी (डिंपल कपाडिया)सोबत राहतेय. एंजीला दुसऱ्याना मदत करण्याची भारी आवड... 

एके दिवशी गावातल्याच एका म्हाताऱ्या पोस्टमन फर्डीला (नसरुद्दीन शाह) एक चिठ्ठी मिळते. हीच चिठ्ठी त्यानं 46 वर्षांपूर्वी स्टेफॅनी फर्नांडीसला लिहिलं होतं... जिच्यावर तो मनापासून प्रेम करत होता... चिठ्ठी मिळताच त्याला समजतं की तो इतकी वर्ष उगाचच स्टेफॅनीनं रिजेक्ट केलं म्हणून कुढत होता... आता, त्याला त्याच्या जीवनात एक आशा दिसते, आपलं प्रेम परत मिळवण्याची...

या आशेला मूर्त रुप देण्यासाठी एंजी त्याच्या मदतीसाठी पुढे होते... यासाठी ती डॉन पित्रैदोला (पंकज कपूर) त्याची गाडी मागते. पित्रैदो एक वैतागलेला आर्टिस्ट आहे... जो संपूर्ण सिनेमाभर एक पेन्टिंग काढण्याचं प्रयत्न करतोय... ते पेन्टिंग आहे रोजीचं... पित्रैदोच्या गाडीबरोबर एक इरिटेटिंग मॅकनिक सेव्हियो (अर्जुन कपूर) ड्रायव्हर बनून त्यांच्यासोबत जायला एका पायावर तयार होतो... तो केवळ एंजीसाठी... एंजीवर तो आपला जीव टाकतोय. 


 

अभिनय 
सिनेमात नसरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर या सिनिअर तिकडीनं कमाल केलीय. दीपिका पादूकोण आणि अर्जुन कपूरनंही आपला भाग उत्तम वठवलाय. दीपिकासाठी या सिनेमात करण्यासाठी काही वेगळं नव्हतं... पण, जे काही केलंय ते तिनं चांगलंच केलंय.

या सिनेमाची जान ठरलाय तो म्हणजे नसरुद्दीन शाह... नसरुद्दीनच्या म्हाताऱ्या चेहऱ्यावरचे तरुण भाव तुम्हाला त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतात. आपली भूमिका जिवंत करण्यासाठी त्यानं कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. दु:खी असो, रोमान्टिक असो किंवा इमोशनल... नसरुद्दीनचा प्रत्येक भाव तुम्हाला इम्प्रेस करतो. 

हा ढोबळमानानं कॉमेडी सिनेमा नसला तरी पंकज कपूरचे काही डायलॉग्स आणि सीन्स तुम्हाला पोट धरून हसायला लावतात.

या सिनेमात रणवीर सिंहनं एक कॅमियो रोल केलाय. पण, त्याच्या अभिनयाचा उल्लेख करावाच लागेल. तुम्हाला तो थिएटर बाहेर पडल्यावरही लक्षात राहतो, हे नक्की... 

कसा आहे सिनेमा... 
सिनेमाचा फर्स्ट हाफ तुम्हाल थोडा स्लो वाटू शकतो. पण, इंटरवलनंतर मात्र सिनेमाचा जम चांगला बसलाय. 

फर्डी आपल्या प्रेमाला शोधण्यासाठी बाहेर पडतो... पण, या संपूर्ण रोड ट्रीपमध्ये त्याला जाणीव होते की आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी आपण गृहीत धरतो... आणि जगण्यासाठी कारण मात्र बाहेर शोधत बसतो... त्यांची ही रोड ट्रीप नक्कीच बोअर नाही...
 
शेवटी काय तर...
इतर मसाला फिल्म्स पाहून तुम्ही बोअर झाला असाल तर हा सिनेमा तुम्ही नक्कीच पाहू शकता...  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.