मुंबई : 'खिलाडी' अक्षय कुमारने आजवर आपल्याला त्याच्या अनेक चित्रपटांतील साहसी कारनाम्यांमुळे तोंडात बोटं घालायला लावलीत. पण, हाच खिलाडी आता हळवा झालाय. 'स्कॉट कॉसग्रोव्ह' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्टंटमनचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्याचाच शोक व्यक्त करताना अक्षयने या क्षेत्रात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या व्यक्तींना एक अनाहून पत्र लिहिलंय. या पत्रातील मजकूर हृदयाला भिडणारा आहे.
काय म्हटलंय अक्कीनं आपल्या पत्रात...
माझ्या प्रिय स्टंटमेन आणि स्टंटवुमेन,
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका स्टंटमॅनचा मृत्यू झाल्याची बातमी आत्ताच माझ्या कानावर आली. त्याने माझ्यासोबत काम केले होते. आत्ताही तो मला पार्कर जिममध्ये प्रशिक्षण द्यायला येणार होता, पण त्याच्या निधनाची बातमी आली. मला खूप दुःख झालंय.
तुम्हाला केवळ ऑस्कर्स किंवा फिल्मफेअर पुरस्कार मिळावे असं मला वाटत नाही, तर माझ्या नजरेत आमचा जीव आणि आमची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तुम्ही दिलेल्या योगदानाची दखल जगाने घ्यावी, असंदेखील मला वाटतंय.
मला या गोष्टीची कल्पना आहे की एखादा कलाकार चित्रपटाचं शूटिंग करत असताना कोणताही कलाकार त्याच्या स्टंटमॅनशिवाय हे शूटिंग करण्याची कल्पनादेखील करू शकत नाही. तुम्ही नसता, तुमचे कष्ट नसते, तुमची हिेम्मत नसती तर आमच्यातल्या अनेक कलाकारांच्या मृत्यूचा शोक करण्याची वेळ आज आमच्यावर आली असती. तुमच्याच कष्टांमुळे आज आमचे चित्रपट इतके आकर्षक होतात आणि आम्ही इतके पैसे कमवतो.
आजपर्यंत जितक्या स्टंटमनचा कोणत्याही कारणाने चित्रपटाच्या सेटवर, सेटच्या बाहेर किंवा स्टंट करताना मृत्यू झाला त्यांच्या दुःखाचा शोक मात्र शांतपणे आपांपसांत व्यक्त केला गेला. यातील अनेकांमुळे चित्रपटांना प्रतिष्ठीत पुरस्कारही मिळाले होते. या लाखो डॉलर्सच्या प्रकल्पांसाठी तुम्हाला एखादा पुरस्कार देणं म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल असं मला वाटत नाही, पण निदान ही एक लहानशी सुरुवात असेल.
एक स्टंटमन आणि अभिनेता असल्याच्या नात्याने तुम्ही करत असलेल्या कामाविषयी मी आभारी आहे, त्याचा मला आदर आहे आहे, तुम्ही आमच्यासाठी जे काही करता त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. आज माझ्या मुलांना त्यांचा बाबा सुस्थितीत दिसतोय, याचं कारण म्हणजे मी जे काही करू शकत नाही ते करण्यासाठी तुमच्यातील कोणीतरी कायमच उपस्थित असतं.
जगभरात माझ्यासोबत स्टंट करणाऱ्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रीणींनो, मी आणि माझे कुटुंबीय नेहमी ईश्वराकडे तुमच्यासाठी प्रार्थना करतो. एका भरभक्कम रक्कमेपेक्षा बरंच काही जास्त तुमच्या वाट्याला यावं, अशी माझी खरोखर इच्छा आहे. ते पाहण्याचा योग माझ्या हयातीत यावा असंही मला वाटतं.
माझ्या गेल्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये या सर्वात फारसा काही फरक पडला नाही याची मला पुरेपूर कल्पना आहे. पण, तो पडावा यासाठी मी आज प्रयत्न करतोय आणि उद्याही करतच राहीन.... तोपर्यंत थँक यू आणि स्वतःची काळजी घ्या. तुमच्या हक्कांसाठीच्या लढाईसाठी माझ्या शुभेच्छा. जे स्टंट करताना आपल्या प्राणाला मुकले त्यांना माझी आदरांजली.
- अभिनेता आणि स्टंटमन अक्षय कुमारकडून प्रेम आणि प्रार्थनांसह