www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तान यात्रेवर असलेल्या नितीशकुमारांनी काल रात्री पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यासोबत दिवाळीनिमित्त खास सहभोजन केलं. या प्रसंगी पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुधारावेत अशी भावना झरदारींनी व्यक्त केली. त्याचबरोबर बिहारमधील शिक्षण, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकास यांचं कौतुक केलं.
नितीशकुमार आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाला काल झरदारींनी दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी ही भेट असल्याचं झरदारींनी स्पष्ट केलं. यानंतर झालेल्या सहभोजनात भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागले, राज्यसभा सदस्य एन के सिंग, विदेश मंत्री हीना रब्बानी खार इत्यादी मंत्री उपस्थित होते. नितीश कुमारांशी बोलताना झरदारी म्हणाले, की बिहारची समृद्ध संस्कृती कौतुकास्पद आहे. याशिवाय नितीशकुमारांनी बिहारमध्ये सामाजिक क्षेत्रात जी प्रगती केली आहे, त्या ‘बिहार विकास मॉडेल’चीही झरदारींनी तारीफ केली.
या प्रसंगी नितीश कुमारांनी झरदारींचे आभार मानले. भारतीय आणि पाकिस्तानी जनता यांच्यातील संबंध लवकरच सुधारतील, असा विश्वास नितीश कुमारांनी व्यक्त केला. या दरम्यान नितीश कुमार ऐतिहासिक मोहेंजोदडोला तसंच काही प्राचीन हिंदू मंदिरांना आणि सिंधमधील हिंदू पंचायतीलाही भेट दिली.