www.24taas.com, वृत्तसंस्था, मनीला
आज सकाळी मध्य फिलीपिन्स भूकंपानं हादरला. 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर अनेक इमारतींना आणि रस्त्यांना भूकंपामुळं भेगा पडल्या आहेत. संपूर्ण परिसरात भूकंपाचे झटके अनुभवले गेले. भीतीमुळं लोक आपल्या घरांमधून बाहेर पडले. आज राष्ट्रीय सुट्टीमुळं अनेक शाळा आणि कार्यालय बंद होती, म्हणून अनेकांचे प्राण वाचले.
स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू बोहोल बेटावरील कारमनजवळ 56 किलोमीटर आत होतं. सुनामीची चेतावनी जारी करण्यात आली नाहीय. बेटाचे गव्हर्नर एडगाडरे चाट्टो यांनी सांगितलं की, बोहोल इथल्या चार जणांचा यात मृत्यू झालाय. शिवाय मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा मृत्यूही झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर दोघांचा मृत्यू सेबू परिसरात बाजारात घराचं छप्पर पडल्यानं झाला. भूकंपामध्ये 19 लोक जखमी झाले आहेत. तर इमारत पडल्यानं एका महिलेचाही मृत्यू झाला.
सेबूचे महापौर म्हणाले, आज सुट्टी असल्यामुळं अनेक कार्यालयं आणि शाळा बंद होत्या, त्यामुळं अनेकांचे प्राण वाचले. रुग्णालयातल्या सर्व रुग्णांना बाहेर आणलं गेलं होतं, मात्र नंतर इमारत सुरक्षित असल्यानं त्यांना पुन्हा रुग्णालयात परत पाठवण्यात आलं.
मनीलाजवळ 570 किलोमीटर अंतरावर असलेल्या सेबू शहरात 26 लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. जवळील बोहोल बेटावरही 12 लाख नागरिक राहतात. बीच आणि बेटावरील असलेल्या रिसॉर्टमुळं अनेक पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण आहे.
मनीलामध्ये आज ईद असल्यानं राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यात आली होती. ज्यामुळं शाळा आणि कार्यालयं बंदी होती. मागील वर्षी मध्य फिलीपिन्समध्ये नीग्रोज बेटाजवळ 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात 100 लोकांचा मृत्यू झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.