सियान : अपघातामध्ये एखादा महत्त्वाचा अवयव गमावला तर एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला कदाचित नकली अवयव बसवलाही जातो. पण शेवटी नकली ते नकलीच. चीनमधल्या काही तज्ज्ञांनी मात्र चक्क त्याच व्यक्तीच्या हाडामासाचा अवयव तयार केला आहे. नेमकं काय घडलंय, बघुया?
चीनच्या शान्सी प्रांतामध्ये सियान या शहरात एक वैद्यकीय चमत्कार घडत आहे. अपघातामध्ये आपला एक कान गमावलेल्या जी नामक एका व्यक्तीला चक्क त्याच्या हाडामासापासून तयार झालेला कृत्रिम कान बसवला जाणार आहे.
त्याच्या हातावर सध्या हा कान उगवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिओटाँग विद्यापीठामध्ये प्लॅस्टिक सर्जरी विभागात गुओ शुझाँग यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांचा चमू यावर काम करत आहे.
आम्ही 3-4 महिन्यांपूर्वी त्याच्या हातामध्ये डायलेटर सोडला. त्यानंतर आम्ही दररोज थोडं-थोडं पाणी तिथं इंजेक्ट करत राहिलो. काही दिवसांनी तिथं गाठ तयार झाली. हे मांस पुरेसं पातळ असणं आवश्यक होतं. कारण त्याला हवा तो आकार देता यायला हवा, असे गुओ शुझाँग म्हणालेत.
डॉक्टरांना पुरेसं मांस मिळाल्यानंतर डॉक्टरांनी जी याच्या छातीच्या बाजुला लहानसा छेद देऊन तिथून तीन लवचिक हाडं बाहेर काढली. मांस आणि हाडं हाती आल्यावर त्यांचा वापर करून कानाला आकार देण्याचं काम सुरू झाले.
सर्वात अवघड काम होतं ते आकार देण्याचं. हे कलात्मक काम आहे. कानामध्ये अनेक लहानमोठे बारकावे असतात. देवानं जसा कान बनवलाय, तसाच बनवणं हे सर्वात कठीण. हे ऑपरेशन म्हणजे देवाला दिलेलं आव्हानच, असे गुओ शुझाँग सांगतात.
एका अपघातामध्ये जी यांच्या एका कानाची पाळी तुटला. त्यानंतर त्यांना बाहेर पडायचीही लाज वाटू लागली. ऐकू येत असलं तरी आंघोळ करताना कानात पाणी जात असे.. त्यामुळे ते पार खचून गेले होते... विद्यापीठातल्या डॉक्टरांनी केलेल्या या चमत्कारामुळे त्यांना पुन्हा नवं जीवनच मिळाल्याचा भास होत आहे.
हे खूप छान झालं. प्राध्यापक गुओ यांचा मी ऋणी आहे. आता हा कान लवकर वाढेल याची मी वाट बघतोय. म्हणजे तो डॉक्टर माझ्या डोक्यावर बसवतील, असे जी म्हणालेत.
अपघातामुळे अशा घटना वारंवार घडत असतात. चीनमधल्या डॉक्टरांनी घडवलेल्या या वैज्ञानिक चमत्कारामुळे एक नवा आशेचा किरण जागृत केला आहे.