भारतीय वंशाच्या नाडेलांच्या हातात `मायक्रोसॉफ्ट`ची विंडो!

भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या `सीईओ`पदी नियुक्ती झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 5, 2014, 09:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या `सीईओ`पदी नियुक्ती झालीय.
४६ वर्षांचे नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे तिसरे `सीईओ` ठरले आहेत. विद्यमान सीईओ स्टीव बालमेर यांनी येत्या ऑगस्टमध्ये निव़ृत्ती घेण्याची घोषणा केल्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदाच्या स्पर्धेत अनेक मातब्बरांची नावं होती. मात्र, आंध्र प्रदेशात जन्मलेल्या सत्या यांनी बाजी मारली असून ते ऑगस्टनंतर मायक्रोसॉफ्टचा कार्यभार सांभाळणार आहे.
मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात उत्तम कंपनी असल्याचं निवड झाल्यानंतर सत्या नाडेला यांनी म्हटलंय. `मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी निवड ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आता, मला २२ वर्षांपूर्वीच्या माझ्या मायक्रोसॉफ्टमधल्या पहिल्या दिवसाची आठवण होतेय. बिल गेट्स आणि स्टीव बालमेर यांच्यासह काम करणं मी माझं भाग्य समजतो` अशी भावना नाडेला यांनी व्यक्त केलीय.
`आपल्या इंडस्ट्रीला परंपरेचा नाहीतर नाविन्याचा ध्यास सतत असतो... मायक्रोसॉफ्टसाठी हा अत्यंत कठीण काळ असून कुठलीही चूक आपल्याला महागात पडू शकते. सॉफ्टवेअरची ताकद ओळखून आणि ती उपकरणं आणि सेवांच्या माध्यमातून पुरवून प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला सक्षम बनवण्याचं काम केवळ आपणच करू शकतो. आपल्यापुढे अनेक संधी असून आपण वेगानं मायक्रोसॉफ्टचा विकास करणार आहोत आणि त्यासाठी कठोर परिश्रम आणि स्थित्यंतराची तयारी आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकानंच उत्तम काम करण्याची गरज आहे. अनेक कंपन्या जग बदलण्याची भाषा करतात. मात्र, त्यातल्या मोजक्याच कंपन्यांना नवी शिखरं गाठण्याची ताकद असते... त्यामुळे नवी आव्हानांचा एकत्रितपणे सामना करुयात` असं नाडेला यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
नाडेला यांनी मनिपाल विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतलं. १९९२ साली ते मायक्रोसॉफ्टमध्ये रूजू झाले आणि २२ वर्षांत साईओपदापर्यंत पोहचले. मायक्रोसॉफ्टला महसूलवाढ मिळवून देणाऱ्या क्लाऊड कम्प्युटिंग उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग होता. ना़डेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टनं सॉफ्टवेअर आणि क्लाऊड कम्प्युटिंग व्यवसायात अभूतपूर्व कामगिरी केलीय. त्यामुळे कंपनीच्या महसुलातही मोठी वाढ झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.