सरबजीत सिंग यांचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच?

लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 3, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, लाहोर
पाकिस्तानातल्या जेलमध्ये २२ वर्षं खितपत पडलेल्या भारतीय कैदी सरबजीत सिंग यांची पाकिस्तानातच निर्घृण हत्या झाली. कोमामध्ये गेलेल्या सरबजीत यांनी जिना हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
सरबजीत सिंग यांचं पार्थिव भारतात आणण्यासही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे कठीण झालं होतं. लालफितीच्या कारभारामुळे सरबजीतसिंग यांचं पार्थिव भारतीय अधिकाऱ्यांच्या हाती देण्यात वेळ लावण्यात आला. कस्टम अधिकाऱ्यांनंतर तेथील अँटी-नार्कोटिक्स फोर्सने त्रास दिला. त्यामुळे सरबजीत यांना मरणोत्तर वेदना देण्यातही पाकिस्तान मागे राहिलं नाही.

कस्टम अधिकाऱ्यांनी सरबजीत सिंग यांचं पार्थिव भारताकडे सुपर्द करण्यापूर्वी एनओसी, पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि पोलीस रिपोर्ट यांची मागणी केली. पाकिस्तानात सरबजीत यांच्या देहाचं शवविच्छेदन केलं गेलं. त्यानंतर भारताला सरबजीतसिंग यांचं पार्थिव सोपवण्यात आलं. भारतात पुन्हा सरबजीतसिंग यांचं शवविच्छेदन झालं, तेव्हा, सरबजीत सिंग यांची किडनी आणि हृदय काढून घेतलं असल्याचं आढळून आल्याचं सांगितलं जात आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी जेलमध्ये असणाऱ्या अन्य भारतीय कैद्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी भारताने केली आहे.