नवी दिल्ली : 'सार्क' देशांच्या गृहराज्यमंत्री स्तरीय परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग पाकिस्तानात पोहोचलेत. इस्लामाबादमध्ये उद्या ही परिषद होत आहे.
या परिषदेमध्ये पाकिस्तानात दडून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा सिंग मांडतील, अशी शक्यता आहे. गृहमंत्री म्हणून सिंग यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे.
लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद यासारख्या भारतात कारवाया करणाऱ्या अतिरेकी संघटनांना आसरा देणं पाकिस्ताननं बंद करावं, असंही सिंग खडसावण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंग यांना विरोध करत इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये निदर्शनं करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानच्या संसदभवनापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईद निदर्शनांचं नेतृत्व करत होता... दहशतवादाच्या नावानं गळा काढणाऱ्या पाकिस्तानचा दुटप्पीपणा या निमित्तानं पुन्हा जगासमोर आला आहे.
पाकिस्तान सरकार, लष्कर आणि ISIच्या पाठिंब्याशिवाय राजधानीमध्ये एक अतिरेकी राजरोसपणे कसा फिरू शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.