इराणमध्ये विमान कोसळून चाळीसहून अधिक प्रवासी ठार

विमान अपघातांची मालिका सुरुच असून आज सकाळी इराणमधील तेहरान इथं प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवासी अशा सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

AFP | Updated: Aug 10, 2014, 02:31 PM IST
इराणमध्ये विमान कोसळून चाळीसहून अधिक प्रवासी ठार title=

तेहरान: विमान अपघातांची मालिका सुरुच असून आज सकाळी इराणमधील तेहरान इथं प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवासी अशा सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

इराणमध्ये ‘एअरक्राफ्ट इराण १४०’ या विमानाचा वापर डॉमेस्टिक उड्डाणासाठी केला जातो. रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास या विमानाचे मेहराबाद विमानतळाहून तबसच्या दिशेनं उड्डाण झालं. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान पश्चिम तेहरानजवळ कोसळलं. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. विमानात क्रू मेंबर्स आणि प्रवासी असे सुमारे ४० जण प्रवास करत होते. यात सात लहान मुलांचा समावेश असल्याचं समजतं. 

मात्र विमानात नेमके किती प्रवासी होते याचा आकडा अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही.  विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात आहे. या विमानाची प्रवासी क्षमता ५२ आहे. 

इराणमधील बहुतांशी विमान हे १९७९ मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीच्या पूर्वी विकत घेण्यात आले होते. त्यामुळं इराणमधील अनेक विमानांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याचं जाणकार सांगतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.